खेड ः उद्धव ठाकरे हे भावनिकतेचं राजकारण करताहेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः उद्धव ठाकरे हे भावनिकतेचं राजकारण करताहेत
खेड ः उद्धव ठाकरे हे भावनिकतेचं राजकारण करताहेत

खेड ः उद्धव ठाकरे हे भावनिकतेचं राजकारण करताहेत

sakal_logo
By

पान १ साठी)


उद्धव ठाकरे यांचे राजकारण भावनिक
रामदास कदम; १९ ला खेडमध्ये सभा घेऊन देणार प्रत्युत्तर
खेड, ता. ७ ः आम्ही भावनिक राजकारण न करता विकासाचे राजकारण करतो. आम्हाला कोकणच्या विकासासाठी मुख्यमंत्री निधी देत आहेत. ज्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्या वेळी राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. त्यामुळे स्थानिक माजी आमदारांना बळ मिळाले. आम्हाला संपवण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री अनिल परब आणि मंडळींनी हा डाव रचला होता, असा दावा रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.
खेड येथील गोळीबार मैदानात रविवारी (ता. ५) झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधत टीका केली. त्याला रामदास कदम यांनी खेड जामगे येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
कदम म्हणाले, ‘‘उद्धव यांच्या तोंडी हिंदुत्वाची भाषा शोभत नाही. जेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलेत तेव्हाच तुमचे हिंदुत्व संपले. मला व माझ्या मुलाला संपवण्यासाठी अनिल परबसोबत मातोश्रीनेदेखील विडाच उचलला होता. म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावे लागले, अन्यथा आम्ही राजकारणातून संपलो असतो. २००९ मध्ये मला पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले. त्यांना यशदेखील मिळाले; परंतु आता रामदास कदम गाफील नाही, हे भास्कर जाधव यांनी लक्षात ठेवावे. कोकणात राजकीय शिमगा तुम्ही सुरू केला, त्याचा शेवट मी करेन. भविष्यात मी गप्प बसणार नाही. जे ४० आमदार पक्ष सोडून गेले त्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; परंतु ते आमदार विकासातून उत्तर देतील. हिंमत असेल तर जनतेच्या मैदानावर या, असे म्हणता त्या वेळी मुख्यमंत्री पदावर असताना हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असेही तुम्ही म्हणत होता. अखेर सरकार पडलेच ना. शिवसेना तुमच्या वडिलांनी उभी केली; पण त्यांच्या विचारांशी तुम्ही गद्दारी केलीत.’’
खेडमध्ये १९ ला विराट सभा घेऊन उत्तर देऊ. तेव्हा सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री उदय सामंत, खासदार गजानन किर्तीकर, आमदार भरत गोगावले यांच्यासह शिवसेनेचे आमदार, खासदार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मैदान तेच असेल; पण खरे शिलेदार मैदान गाजवतील यात शंका नाही, असे कदम यांनी सांगितले.

विराट सभा घेतल्याचे भासवण्यात येते
काल खेडमध्ये जो राजकीय शिमगा झाला त्यात खेड तालुक्यातील किती लोक उपस्थित होते. सर्व मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कऱ्हाड येथील भाड्याची माणसे आणून आम्ही किती मोठी विराट सभा घेतली, असे भासवण्यात आले. याचे समाधान उद्धव ठाकरे यांना नक्कीच वाटले असेल; पण मला त्यांना सांगावेसे वाटते की अशा सभा एकदा नाही शंभर वेळा घेतल्या तरी योगेश कदम यांना पराभूत करू शकत नाही. मला संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केला आहे. उद्धवजी तुमचा चेहरा भोळा दिसतो; मात्र त्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपले आहेत. त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे, असे सांगत रामदास कदम यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.


पक्ष जिवंत ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला
उद्धव ठाकरे म्हणतात, ते खोके मुख्यमंत्री विकासकामांसाठी सर्व ४० आमदारांना देत आहेत. त्यामुळे सर्व आमदार आगामी निवडणुकीत निवडून येतील; मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती निधी उपलब्ध करून दिला, हे आकडे जाहीर सभेत एकदा जरूर सांगावेत. तुम्ही दोन वर्षे घरी बसला होता, तेव्हा अजितदादांनी राष्ट्रवादी ५७, काँग्रेसला ३३ आणि मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला केवळ १६ टक्के निधी दिला, याचे तुम्हाला काहीतरी वाटले पाहिजे. त्यामुळे तुमच्याच आमदारांना पक्ष जिवंत ठेवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला, असे कदम यांनी ठणकावले.