सांगेलीत गिरोबा उत्सवास थाटात प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगेलीत गिरोबा उत्सवास थाटात प्रारंभ
सांगेलीत गिरोबा उत्सवास थाटात प्रारंभ

सांगेलीत गिरोबा उत्सवास थाटात प्रारंभ

sakal_logo
By

87550
सांगेली ः गिरोबा उत्सवाच्या प्रारंभ सोहळ्यास उपस्थित भाविक.

सांगेलीत गिरोबा उत्सवास थाटात प्रारंभ

साडेतीनशे वर्षांची परंपरा; भाविकांकडून ‘हर हर महादेव’चा जयघोष

सावंतवाडी, ता. ७ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगळीवेगळी व ऐतिहासिक परंपरा असलेल्या सांगेली गिरोबा उत्सवाचा रविवारी (ता. ५) थाटात प्रारंभ झाला. सुमारे साडेतीनशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या उत्सवासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ढोलताशांच्या गजरात व ''हर हर महादेव''च्या जयघोषात प्रारंभ झालेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याची सांगता गुरुवारी (ता. ९) होणार आहे.
सांगेली गिरोबाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामदेवतेची दरवर्षी पुन:प्रतिष्ठापना करणारे सांगेली येथील गिरिजानाथ हे एकमेव देवस्थान आहे. गिरिजानाथाच्या या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यालाच ''गिरोबा उत्सव'' म्हणतात. दरवर्षी परंपरेप्रमाणे हा उत्सव धुमधडाक्यात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. पंचक्रोशीतीलच नव्हे, तर जिल्हाभरातून या उत्सवाचा सोहळा ''याची देही याची डोळा'' अनुभवण्यासाठी हजारो भाविक यावेळी उपस्थित राहतात. दरवर्षी गिरोबाच्या प्रतिष्ठापनेसाठी फणसाचे झाड निवडले जाते. यावर्षी गिरोबा उत्सवासाठी देवकरवाडीतील तुकाराम राऊळ यांचे फणसाचे झाड निवडण्यात आले. त्याच वेळी म्हणजे खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीपासून या उत्सवाला सुरुवात होते.
रविवारी सायंकाळी गिरिजानाथ मंदिरात देवस्थानचे मानकरी आणि ग्रामस्थ उपस्थित झाल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यावरील एका बाजूचे छप्पर मोकळे करण्यात आले. यावेळी देवाची पडली भरणे, शेष लावणे आदी पारंपरिक धार्मिक कार्यक्रम झाले. त्यानंतर गिरिजानाथ मंदिराकडून सवाद्य निशाणकाठीसह देवस्थानचे मानकरी आणि ग्रामस्थ सवाद्य मिरवणुकीने येथील नियोजित गिरोबा उत्सवस्थळी निघाले. उत्सवस्थळी पोहोचल्यावर सुहासिनींनी देवस्थानच्या मानकऱ्यांचे औक्षण केले. त्यानंतर गिरिजानाथाच्या मूर्तीसाठी निवडण्यात आलेल्या फणसाच्या झाडाची विधीवत पूजाअर्चा करून, शेस लावून गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर ''हर हर महादेव''च्या जयघोषात व ढोलताशांच्या गजरात देवाचे झाड तोडल्यानंतर भाविक नतमस्तक झाले. सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत फणसाच्या खोडापासून गिरोबाची मूर्ती घडविण्यात सांगेली पंचक्रोशीतील शेकडो सुतार कारागिरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मध्यरात्रीनंतर गिरोबाची मूर्ती साकारल्यानंतर पहाटेच्या सुमारास सवाद्य मिरवणुकीने गिरोबाची ही मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी मंदिरात नेतात. देवाला खांद लावण्याचा नवस असल्याने गिरोबाच्या या मूर्तीला खांद लावण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ असते. पुढे होळी आणि त्यापाठोपाठ गिरिजानाथाची मूर्ती असते. सोबत नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजीही असते. पहाटे साडेतीनच्या सुमारास मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचे नियोजन करण्यात आले. तत्पूर्वी जुना देव नेमातून काढून त्याठिकाणी या नवीन देवाची प्रतिष्ठापना केली जाते.