
‘गोमॅको’त जिल्हावासीयांना दर्जेदार सुविधा
87561
गोवा ः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेताना भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली. सोबत आमदार प्रवीण आर्लेकर, एकनाथ नाडकर्णी व अन्य पदाधिकारी.
‘गोमॅको’त जिल्हावासीयांना दर्जेदार सुविधा
मुख्यमंत्री प्रमोद सावंत; जिल्हा भाजप शिष्टमंडळाला आश्वासन
दोडामार्ग, ता. ७ ः बांबोळी येथील गोमॅको रुग्णालयात सिंधुदुर्गवासीयांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच मोपा विमानतळ प्रकल्पात जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.
सिंधुदुर्गवासीयांना गोव्यात उत्कृष्ट आरोग्य सुविधा मिळावी, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व गोवा-महाराष्ट्र सीमेवरील रस्ते सुस्थितीत करण्यात व्हावे, या विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष तेली व कार्यकर्त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भेट घेतली. भेटीदरम्यान विविध विकासात्मक विषयांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आल्याची माहिती दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी दिली.
सिंधुदुर्ग व गोवा राज्याचे पूर्वापार ऋणानुबंध आहेत. ते ऋणानुबंध जपण्याचे प्रामाणिक प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्य करीत आहे. गोवा राज्याचे वेळोवेळी सहकार्य लाभते; परंतु काही उणिवा भासत असल्याने जिल्हाध्यक्ष तेली यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, दोडामार्ग तालुकाध्यक्ष दळवी, पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, महेश धुरी, ब्रिजेश नाईक उपस्थित होते.
सिंधुदुर्गवासीयांना गोवा-बांबोळी रुग्णालयात सुविधा मिळते; परंतु त्याहीपेक्षा दर्जेदार चांगली सुविधा मिळावी. तशीच सुविधा आयुष रुग्णालयातही देण्यात यावी. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळावर सिंधुदुर्गातील युवकांना देखील नोकरीसाठी प्राधान्य देण्यात यावे. गोवा व महाराष्ट्र हद्दीवर असलेल्या हसापूर-करमळी-कळणे रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, हे विषय मांडून त्यावर चर्चा केली. चर्चेदरम्यान मुख्यमंत्री सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सिंधुदुर्गवासीयांना मोपा विमानतळावर नोकरीसाठी प्राधान्य दिले जाईल. बांबोळी रुग्णालयात सिंधुदुर्गवासीयांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर पुढील तीन महिन्यांच्या आत आयुष हॉस्पिटलमध्येही आरोग्य सेवा देण्याची तजवीज करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री सावंत यांनी भाजप शिष्टमंडळाला दिली.