
तक्रार केली म्हणून मालवणात मारहाण
तक्रार केली म्हणून
मालवणात मारहाण
धुलीवंदन कार्यक्रमाला गालबोट
मालवण, ता. ७ : शहरात धुलीवंदन उत्सवात रंगाचा बेरंग झाल्याची घटना घडली. चिवला बीच येथे काही पर्यटन व्यावसायिकांनी लावलेल्या साऊंड सिस्टीमची तक्रार पोलिसांत केली, या रागातून सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या राजकीय पदाधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना युवकांनी मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत मालवण पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार सायंकाळी उशिरापर्यंत नव्हती; मात्र या घटनेची जोरदार चर्चा शहरात नाक्यानाक्यावर होती.
शहरात धुलीवंदन निमित्त ठिकठिकाणी आनंदोत्सव सुरू असतानाच रंगांची उधळण सुरू असताना रंगाचा बेरंग चिवला बीच किनारी झाला. चिवला बीच येथे एका बड्या राजकीय पदाधिकाऱ्याचे हॉटेल आहे. त्या हॉटेल समोर काही पर्यटन व्यावसायिकांनी साउंड सिस्टीम लावली होती. याठिकाणी गाण्याच्या तालावर युवक आनंद साजरा करत होते. दरवर्षी हा आंनद उत्सव चालू असतो. त्याच धर्तीवर मजा मस्ती चालू असताना एक राजकीय गाणे लागले. हे गाणे बंद करण्यासाठी त्या राजकीय पदाधिकाऱ्याने सांगितले; मात्र युवक रंगांच्या उधळणीत दंग होते. गाणे बंद न झाल्याने त्या राजकीय पदाधिकाऱ्याने आपल्या टेबलावरील एक बॉटल त्या युवकांवर फेकली. यातून वादाची ठिणगी पडली. पोलिसांना बोलावण्यात आले; मात्र तोपर्यंत वाद भडकला. त्या संतप्त युवकांनी त्या राजकीय पदाधिकारी व त्याच्या दोन सहकाऱ्यांना मारहाण केली. पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनंतर वाद शांत झाला; मात्र कोणतीही तक्रार पोलिस ठाण्यात दिलेली नाही.