
रत्नागिरी ः ‘उमेद’मुळे 47 हजार महिला होणार स्वयंपूर्ण
rat८p१२.jpg
L८७६४३
रत्नागिरीः भाजीपाला व्यावसायासाठी केलेली लागवड.
---------------
४७ हजार महिला होणार स्वयंपूर्ण
‘उमेद’अंतर्गत वर्षात ४ हजार ७६९ गट स्थापन; व्यावसायासाठी १७१ कोटी कर्ज
रत्नागिरी, ता. ८ः ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देतानाच त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी उमेदअंतर्गत बचत गट चळवळ उभारली आहे. यामधून यंदा वर्षभरात ४ हजार ७६९ महिला बचतगटांची स्थापना केली आहे. त्यांना विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी १७१ कोटी ४१ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. काही व्यवसाय सुरू झाले असून, गटातील ४७ हजार महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहणार आहेत.
तळागाळातील कुटुंबांना स्वयंरोजगार मिळावा व दारिद्र्य कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवते. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान. ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दिष्टं घेऊन एकत्र येतात. त्यांना सरकार या अभियानातून बळ देत आहे. केंद्र आणि राज्याचा मिळून महिलांच्या सक्षमीकरणासाठी निधीची तरतूद केली जाते. याची सुरवात महाराष्ट्रात २०११ ला झाली. या अंतर्गत बचतगटांची साखळी तयार करून त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षणे दिली जातात. अभियान सुरू झाल्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार ७३१ बचतगटांची स्थापना झाली असून त्यात १ लाख ६८ हजार ९२४ महिला सहभागी आहेत. त्यामध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षात स्थापन झालेल्या ४ हजार ७६९ गटांचा समावेश आहे. या गटामध्ये ४७ हजार महिला सहभागी आहेत. प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळावे यासाठी बँकांमार्फत कर्ज घेतले जाते. त्यावर त्यांना व्याज सवलत, शासनाकडून अनुदान दिली जाते. नव्याने स्थापन केलेल्या बचतगटांनी फळबाग लागवड, आंबा-काजू बी प्रक्रिया युनिट, शेळीपालन, गोपालन, घरघंटी, शिलाई मशिन, पापड उद्योग, लोणची उद्योग, कुक्कुटपालन यासारखे व्यावसायासाठी कर्ज घेतली आहेत. मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले जात असल्यामुळे महिला मुंबई-पुण्यासारख्या शहरातील मॉलमध्ये विक्रीसाठी स्वतःहून साखळी तयार करू लागल्या आहेत. जिल्हा परिषदेकडूनही प्रदर्शन व विक्री मेळावे घेतले जात असल्याने त्याचा फायदा होत आहे. यामधून उत्पन्नाचा पर्याय महिलांना मिळालेला आहे.
चौकट
तालुका गट कर्ज (रुपये)
* मंडणगड १३७ ४ कोटी ४० लाख
* दापोली ९३३ ३३ कोटी ९२ लाख
* खेड ३६६ ११ कोटी १८ लाख
* गुहागर ४५५ १३ कोटी ३० लाख
* चिपळूण ८३८ ३१ कोटी २९ लाख
* संगमेश्वर ३०३ १२ कोटी ६९ लाख
* रत्नागिरी १०७५ ४२ कोटी ५२ लाख
* लांजा २०७ ६ कोटी ७४ लाख
* राजापूर २५३ ७ कोटी १६ लाख
* अन्य २०२ ८ कोटी १८ लाख