
मंडणगड ः शिमगोत्सवात दोन बहिणींची 25 वर्षांनी भेट
rat८p५.jpg-
८७६२०
शेवरे : शेवरे गावची ग्रामदेवता वरदानदेवी व डौली गावची ग्रामदेवता जनाईदेवी या दोन बहिणींची भेट घडवून आणताना गावकरी.
---------------
शिमगोत्सवात दोन बहिणींची २५ वर्षांनी भेट
शेवरे व डौली गावाच्या ग्रामदेवता; भक्तीमय वातावरणात दोघींची आराधना
मंडणगड, ता. ८ः मंडणगड तालुक्यातील शेवरे गावची ग्रामदेवता वरदानदेवी व दापोली तालुक्यातील डौली गावची ग्रामदेवता जनाईदेवी या दोन बहिणींचा २५ वर्षानंतर भेटीचा सोहळा शिमगोत्सवात शेवरे या गावी पार पडला. दोन बहिणींच्या भेटीचा भक्तीमय सोहळा पाहण्यासाठी दोन्ही गावातील गावकऱ्यांनी व भक्तांनी गर्दी केली.
मंडणगड तालुक्यातील शेवरे गावातील जागृत देवस्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या वरदान देवी व दापोली तालुक्यातील डौली गावातील जागृत देवस्थान असलेल्या नवसाला पावणाऱ्या जनाईदेवी या दोन सख्ख्या बहिणी मानल्या जातात. दोन्ही तालुक्यात या देवींच्या स्थानाला मोठे महत्व असून भक्तांची ती श्रद्धास्थाने आहेत. यावर्षी डौली येथील ग्रामस्थांनी जनाईदेवीच्या पालखीतील मूर्ती चांदीच्या स्वरूपात नव्याने बनवल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वरदान देवीची भेट घेण्यासाठी जनाई देवीच्या पालखीला डौली येथून वाजतगाजत शेवरे गावात आणण्यात आले.
भक्तीमय वातावरणात या दोन बहिणींची भेट घडवून आणण्यात आली. बऱ्याच वर्षानंतर या दोन बहिणींची भेट होत असल्याने डौली गावातील ग्रामस्थ महिलांनी पालखीबरोबर उपस्थिती लावली. या वेळी दोन्ही गावाच्या ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण होते. खालू बाजा, नगारे वाजवत दोन्ही देवींचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. दोन्ही गावातील महिलांनी देवींची खणानारळाने ओटी भरून मनोभावे पूजा केली. २५ वर्षानंतर वरदान देवी व जनाई देवीची भेट होत असताना प्रत्येकजण आनंद व्यक्त करत या उत्सवात सहभागी झाला होता.