
मोबाईलमुळे समाजात कौटुंबिक वाद
८७७४५
मोबाईलमुळे समाजात कौटुंबिक वाद
ॲड. रुपेश परुळेकर ः कोळंब येथे महिलादिनानिमित्त मेळावा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : स्त्री ही आदिमाया, आदिशक्ती आहे. जे एक स्त्री करू शकते, ते पुरुष करू शकत नाही. आज समाजात मोबाईलमुळे कौटुंबिक वाद, कलह, घटस्फोट, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यांसारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे गंभीर चित्र आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा गावातील वाडीवाडीत चांगला संपर्क असतो. त्यामुळे ज्यांच्यात कौटुंबिक वाद, कलह आहेत, अशांसाठी अंगणवाडी सेविकांनी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक बनावे. जेणेकरून कुटुंबव्यवस्था टिकेल, असे प्रतिपादन ॲड. रुपेश परुळेकर यांनी आज येथे केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प विभागाच्या वतीने कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याचे उदघाटन डॉ. राहुल पंतवालावलकर, ॲड. रुपेश परुळेकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
बालविकास प्रकल्प अधिकारी कौमुदी पराडकर, मुख्यसेविका स्नेहा सामंत, उल्का खोत, प्राजक्ता तुळसकर, स्नेहल गावडे, मंगल जंगले यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲड. परुळेकर म्हणाले, ‘‘महिलांवर होणारे अत्याचार, अन्यायाच्या विरोधात महिला उभ्या राहत नाहीत, तोपर्यंत अत्याचार करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण होणार नाही. त्यामुळे महिलांनी अशा प्रकारांविरोधात सक्षमपणे उभे राहून लढा द्यायला हवा. आज समाजातील वाढत्या घटस्फोटांची प्रकरणे पाहता विवाहसंस्कृती संपत चालली आहे का, अशी भीती निर्माण झाली आहे. प्रत्येकाला दोष देऊन यातून मार्ग सुटणार नाही. महिलांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कुटुंबातील वाद हे कुटुंबातच मिटले पाहिजेत. स्त्रीची जशी समजून घेण्याची जबाबदारी आहे, तशीच पुरुषाचीही आहे. स्त्रीचा आत्मसन्मान ठेवायला पाहिजे. जी जी माणसे मोठी झाली, त्यात महिलांचे योगदान मोठे राहिले आहे.’’ या वेळी डॉ. पंतवालावलकर यांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
विविध स्पर्धांचा अनुक्रमे निकाल असा ः पाककृती-ः विद्या सावंत (घावणे भाजी, वायंगणी अमरेवाडी), भारती दळवी (खोबऱ्याची वडी, तळगाव देऊलवाडी), वैभवी भांडारकर (शेवगा भाजी भाकरी, सोलकडी, काळसे माळकरवाडी). अनौपचारिक शिक्षण हस्तकला ः शीतल नाईक (धामापूर बौद्धवाडी), सीमाली परब (सर्जेकोट), वर्षा जाधव (त्रिंबक बागवेवाडी) यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन उल्का खोत यांनी, स्नेहा सामंत यांनी आभार मानले.