
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
पान ५ साठी, संक्षिप्त
८७६८२
पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली विद्यार्थिनींना मदत
रत्नागिरी ः जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून आज दोन मुलींना जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी मदत केली. त्या दोन मुलींनी उच्च माध्यमिक परीक्षा दिली असून, त्या दोघींनाही आई-वडील नाहीत. या दोन मुलींना बारावीनंतर एमएससीआयटी आणि टायपिंगचा कोर्स करायचा असल्याने त्यांच्या फी एवढी रक्कम त्यांना दिली आहे. या वेळी त्यांनी प्रत्यक्ष त्या दोन मुलींशी संवाद साधला. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यापुढे काहीही मदत लागली तरी मी नक्की करेन, असे आश्वासनही दिले. संस्थेच्या प्रतिनिधीशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘मी आतापर्यंत सरकारी नोकरीत अनेक लोकांना मदत दिली आहे; परंतु एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या महिलांना मी मदत करू शकते, हे मला गुरूप्रसाद संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर कळले. आणखी अशीच मदत वेळोवेळी करेन.’’ जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम पाहताना त्यांनी जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी गुरूप्रसादच्या सदस्यांना अंत्योदय अन्नयोजनेसंबंधित अडचणी असल्यास त्या सोडवण्याबाबत मार्गदर्शन केले.
८७६८१
समन्वय समितीतर्फे संपाचे निवेदन
रत्नागिरी ः सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर संघटना, नगरपालिका, अंशकालीन, कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी समन्वय समितीतर्फे आज १४ मार्चच्या मोर्चाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्याकडे दिले. या वेळी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष दिनेश सिनकर, सचिव सागर पाटील, मध्यवर्ती संघटनेचे कोषाध्यक्ष केदार कोरगावकर, हिवताप कर्मचारी जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष एस. बी. कुवळेकर, मध्यवर्ती संघटनेचे सदस्य अजित पिलणकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नवीन अंशदायी परिभाषित पेन्शन योजना रद्द करून सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली समन्वय समितीच्या वतीने १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेंद्र भोजे यांनी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना या संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
८७६९२
महिला दिनानिमित्त सीए इन्स्टिट्यूट
रत्नागिरी शाखेतर्फे वॉकेथॉन
रत्नागिरी ः सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्यावतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. या निमित्त भाट्ये किनाऱ्यावर वॉकेथॉन हा कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये रेखा यादव यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच द्वितीय ओवी गडाळे, तृतीय गौरी जोशी यांनी यश मिळवले. या वेळी पोलिस अधिकारी बेंदरकर, राज्य जीएसटी अधिकारी स्वप्नाली चव्हाण, विभावरी पाटील, सीए इन्स्टिट्यूटचे शाखाध्यक्ष सीए मुकुंद मराठे, उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, सचिव सीए शैलेश हळबे, कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी, विकासा अध्यक्ष सीए केदार करंबेळकर आणि सदस्य सीए प्रसाद आचरेकर यांच्यासह माजी अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये, सीए आनंद पंडित आदी उपस्थित होते.
८७६९८
वसतिगृहास माजी विद्यार्थिनीची पाच लाख देणगी
रत्नागिरी ः रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) पा. शं. केळकर विद्यार्थिनी वसतिगृहाला संस्थेच्या सल्लागार आणि माजी विद्यार्थिनी अनघा चितळे यांनी लाखाची देणगी दिली. संस्थांच्या उन्नतीत महिलांचे योगदान या विषयावर चितळे यांनी मार्गदर्शन केले. कुटुंब संस्था, शिक्षणसंस्था तसेच अन्य सामाजिक आणि व्यावसायिक संस्थांच्या निर्मिती, प्रगती आणि उन्नतीमध्ये महिला कशा प्रकारे महत्वाचे योगदान करत असतात हे विविध उदाहरणांसह सांगितले. माजी विद्यार्थिनी म्हणून त्यांनी त्या वेळच्या वसतिगृहातील त्यांचे अनुभव सांगितले. पाच लाखाच्या देणगीचा धनादेश त्यांनी कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी पदाधिकारी डॉ. चंद्रशेखर केळकर, मनोज पाटणकर, प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, डॉ. अपर्णा कुलकर्णी, सुनीता पाध्ये-जोशी उपस्थित होत्या. वसतिगृह अधीक्षक डॉ. विवेक भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी प्रतिनिधी सलोनी लुडबे यांच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षिका जान्हवी भिडे यांनी केले.