
आर्थिक अपहारप्रकरणी लिपिकास जामीन
आर्थिक अपहारप्रकरणी लिपिकास जामीन
ओरोस ः सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आर्थिक अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम शेषराव फुसांडे (वय ३६, यवतमाळ) यांना येथील जिल्हा मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. फुसांडे यांच्यावतीने वकील अमोल सामंत यांनी काम पाहिले. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क व अनामत रक्कम शासकीय खात्यावर जमा न करता वैयक्तिक खात्यावर तत्कालीन वरिष्ठ लिपिक फुसांडे यांनी जमा केल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात २५ जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. याबाबत मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, या प्रकरणी त्यांना न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना ८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ हजारांचा जामीन मंजूर केला.