
वेंगुर्लेत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
swt९९.jpg
87891
वेंगुर्लेः पालिका स्वच्छता दूत महिला कर्मचाऱ्यांचा महिलादिनी सन्मान करताना शिवसेना पदाधिकारी.
वेंगुर्लेत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
शिवसेनेचा पुढाकारः महिलादिनानिमित्त तालुक्यात विविध उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ९ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ले येथे शिवसेनेच्या वतीने येथील पालिका महिला स्वच्छता दूत, महिला शेतकरी व बागायतदार, उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर तसेच महिला विभागातील आरोग्य कर्मचारी, वेंगुर्ले तालुका कृषी अधिकारी व महिला कर्मचारी त्याचबरोबर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा महिलादिनी सन्मान करण्यात आला.
वेंगुर्ले शिवसेनेच्या वतीने महिलादिनाचे औचित्य साधून शहरात व तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, महिला तालुकाप्रमुख श्रद्धा परब-बाविस्कर, महिला विभागीय संघटक सायली आडारकर यांच्यावतीने शहरातील विविध क्षेत्रांतील शेतकरी, सरकारी कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य अधिकारी, पोलिस व स्वच्छता दूत, पालिका कर्मचारी अशा शंभर महिलांचा सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला.
वेंगुर्ले पालिकेच्या स्वच्छ सुंदर पर्यटन क्षेत्र कंपोस्ट गार्डन येथे कार्यालयीन प्रमुख संगीता कुबल, महिला बचतगट विभागाच्या प्रमुख निशा आळवे यांच्यासहित नगरपालिका स्वच्छता दूत, महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली पवार, आरोग्य महिला अधिकारी पी. पी. आरावंज, सुखदा पेडणेकर, संजना मोचेमाडकर, प्रणाली साळगावकर, प्राजक्ता राठोड यांच्यासह अन्य महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी महिला, बागायतदारांचा बांधावर जाऊन सन्मान केला. याबरोबरच वेंगुर्ले तालुका कृषी कार्यालय व पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी, कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला. शहर प्रमुख उमेश येरम, जिल्हा संघटक सचिन वालावलकर यांच्या संकल्पनेतून महिलादिनी हा सन्मान करण्यात आला.