
आंबा फळ भाजण्याच्या प्रमाणात वाढ
फोटो फाईल ः
- rat९p१०.jpg- KOP२३L८७८५८
राजापूर ः वाढत्या उन्हामध्ये भाजलेले आंबे
- rat९p११.jpg- KOP२३L८७८५९
राजापूर ः उन्हामुळे झाडावरील आंब्यांची अशी स्थिती आहे.
- rat९p१२.jpg- KOP२३L८७८६०
एका बाजूने लागलेला आंबा
आंबा फळ भाजण्याच्या प्रमाणात वाढ
बागायतदारांच्या खर्च-उत्पन्नाचे गणित बिघडले ; आर्थिक चटकाही
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः गेल्या काही दिवसांमध्ये हवामानामध्ये बदल झाला असून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्याचा आंबा-काजू पिकावर प्रतिकूल परिणाम फळ भाजण्यासह फळगळती होण्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील परिसरातील गावांमध्ये बागांमध्ये फळगळती आणि आंबा फळ भाजण्याचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र आहे. आधीच विविध कारणांमुळे आंबा-काजू बागायतदारांच्या खर्च-उत्पन्नाचे गणित यावर्षी बिघडलेले असताना आता तापमान वाढीमुळे होणार्या आर्थिक नुकसानीचे चटकेही बागायतदारांना सहन करावे लागणार आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये हवामानामध्ये कमालीचा बदल झाला असून दिवसागणिक तापमान वाढत चालले आहे. वाढणार्या उन्हाच्या झळ्या असह्य होऊ लागल्या आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम कोकणातील उत्पन्नाचे महत्वाचे फळ असलेल्या आंबा, काजू पिकावर दिसू लागला आहे. ज्या बागांमधील झाडांना सुरूवातीला मोहोर येवून फळधारणा झालेली आहे त्या बागांमध्ये फळे परिपक्व होवून काढणीच्या स्थितीमध्ये झाली आहेत. त्यातून, बागायतदारांनी फळतोडणी करण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. मात्र, त्यांच्या या तयारीवर प्रतिकूल हवामानाने पाणी पेरले आहे.
गेल्या काही दिवसांतील वाढत्या तापमानामध्ये अनेक बागांमधील झाडांवर अर्धवट भाजलेल्या स्थितीमध्ये तयार फळे दिसत आहेत. तर, काही झांड्या बुंध्याखाली फळगळीत झाल्याचेही चित्र आहे. तापमान वाढत आहे तसतसे फळगळती आणि फळ भाजण्याचे प्रमाण वाढत असून त्यातून बागायतदारांना आर्थिक नुकसानीचे चटके सहन करावे लागणार आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागांमधील बागांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. उशीरा मोहोर, तुडतुड्यांचे जास्त प्रमाण, प्रतिकूल हवामान अशा स्थितीतही तयार झालेला आंबा टिकविण्यासाठी बागायतदारांनी औषध फवारणीसाठी मोठ्याप्रमाणात खर्च केला आहे. मिळणार्या उत्पन्नातून ओषधफवारणीसह मशागती आणि कामगारांसाठी करण्यात येणार्या कर्च भागविणे मुश्किल होवून बसले आहे. अशा स्थितीमध्ये वाढत्या तापमानामध्ये फळ भाजणे आणि फळगळती होण्यामुळे नव्याने बागायतदारांच्या आर्थिक नुकसानीमध्ये अधिकच भर पडणार आहे.
कोट
“ गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेले तापमान आणि प्रतिकूल वातावरणाने आंबा फळ भाजणे आणि फळगळती सुरू झाली आहे. गतवर्षीही तापमानाने आंबा फळगळती आणि फळभाजणी झाली होती. यावर्षीही वाढत्या तापमानामध्ये झालेल्या नुकसानाचे प्रमाण कायम आहे. शासनाने बागायतदारांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी.
- ओंकार प्रभूदेसाई, आंबा बागायतदार
---
कोट
तापमान वाढीमुळे फळगळती आणि आंबा फळ भाजण्याचे प्रमाण वाढल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तालुक्यातील नाटे परिसरातील गावांमध्ये आंबा फळगळती आणि भाजण्याचे प्रमाण अधिक असून, नुकसानाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू आहे.
- अनिल गावीत, तालुका कृषी अधिकारी