
रत्नागिरीत इकॉनॉमिक पार्कला मंजूरी
पान १
रत्नागिरीत इकॉनॉमिक पार्क
अर्थसंकल्पात तरतूद; काजू उत्पादक, मच्छीमारांना दिलासा; वैद्यकीय महाविद्यालयही
रत्नागिरी, ता. ९ : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये जिल्ह्याला झुकते माप देण्याचा प्रयत्न सरकारने केला. लॉजिस्टिक पार्क धोरणानुसार रत्नागिरीत सर्क्युलर इकॉनॉमिक पार्कला मंजुरी दिली. रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयालाही मंजुरी मिळाली आहे. सागरी महामार्ग, मच्छीमार, शेतकरी वर्गालाही योजनांच्या माध्यमातून आधार दिला आहे.
कोकणासाठी काजू फळ विकास योजना सुरू करण्यात येत आहे. रत्नागिरीतील काजू व्यावसायिकांना नवी संधी यातून उपलब्ध होईल. काजू प्रकल्पासाठी ३६००० कोटी अनुदान जाहीर झाले आहे. पारंपरिक मच्छीमारांसाठी ५ लाख विमा संरक्षण देण्याचे घोषित केले आहे. याचा लाभ रत्नागिरीतील पारंपरिक मच्छीमारांना होणार आहे. रत्नागिरीमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी पार्क घोषित झाले आहे. रत्नागिरीचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार, ही घोषणा महत्त्वपूर्ण आहे.
गडसंवर्धनासाठी ३०० कोटींची तरतूद, विरार अलिबाग नव्या कॉरिडोरसाठी ४० हजार कोटींची तरतूद, रत्नागिरीत सर्क्युलर इकॉनॉमिक पार्क सुरू होत असल्याने शिपब्रेकिंग युनिट उद्योग उभा राहून रोजगार वाढेल. शैवालशेती प्रोत्साहन योजना चांगली आहे. रेवस रेड्डी सागरी महामार्ग तरतुदींचे स्वागत आहे. या महामार्गामुळे कोकणातील पर्यटनविकास वाढण्यास मदत होणार आहे.
अर्थसंकल्पावर बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले, ‘‘पहिल्याच संधीत राज्याच्या अर्थसंकल्पातून अमृतधारांचा देवेंद्र फडणवीस यांनी वर्षाव केला. शिक्षणासाठी १ लाख २६६ कोटींची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प. मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा ही अमृत वर्षावासारखी आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन काही भरीव योजना या अर्थसंकल्पात दिसतात. १ रुपयात पीक विमा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. पीक विम्याच्या हप्त्याची पूर्ण रक्कम राज्य शासन भरणार आहे. शेतकऱ्यांना अधिकचे ६००० या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहेत. मागेल त्याला शेतमळे प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान, पंचनामे ई पंचनाम्याच्या माध्यमातून होणार असल्याचे अंदाजपत्रकात घोषित केले आहे.’’
समाजमित्र घटकांना अमृत मात्रा, अंगणवाडी सेविकांचे मानधन १०,००० करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. कोतवालांचे मानधन १५००० करण्याचा निर्णय शिक्षक सेवकांच्या मानधनात वाढ केली आहे. महिलांना व्यवसाय करात दिलेली सवलत, बचत गटातील उत्पादकांसाठी मुंबईमध्ये युनिटी मॉल सुरू करण्याची घोषणा महत्त्वपूर्ण आहे. महिलांना एस.टी. प्रवासात ५० टक्के सवलत देतानाच लेक लाडकी योजना प्रभावी करत मुलीला सज्ञान होताच ७५ हजार रोख दिले जाणार असल्याची घोषणा खूप उपयुक्त ठरणारी व स्त्रीच्या भवितव्याची काळजी घेणारी योजना ठरेल.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील उपचार खर्चाची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवतानाच २०० नवी रुग्णालये या योजनेसाठी पात्र करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये कोकणवासीयांना भरभरून दिले. पारंपरिक मच्छीमार व्यावसायिकांना पाच लाख विमा सुरक्षा मिळाली आहे. अर्थाबरोबर संकल्प असल्याने स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया ॲड. विलास पाटणे यांनी दिली.
दृष्टिक्षेपात
जिल्ह्याला झुकते माप देण्याचा प्रयत्न
सागरी महामार्गाने मच्छीमार, शेतकऱ्यांना आधार
काजू फळ विकास योजना
पारंपरिक मच्छीमारांसाठी ५ लाख विमा संरक्षण
रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय