
करुळमध्ये बारा लाखाची दारू पकडली
swt९२८.jpg
८८०२१
करुळः येथील तपासणी नाक्यावर दारूने भरलेला ट्रक पकडण्यात आला.
करुळमध्ये बारा लाखाची दारू पकडली
पोलिसांची कारवाईः ट्रकमधून उस्मानाबादकडे सुरू होती वाहतूक
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ९ः गोवा बनावटीची १२ लाख रुपये किंमतीची दारू उस्मानाबादला घेऊन जाणाऱ्या ट्रकवर पोलिस हवालदार नितीन खाडे यांनी करुळ तपासणी नाक्यावर कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकमधील दोघांना अटक केली असून दारूसह २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई काल (ता. ८) रात्री पावणेनऊ वाजता करण्यात आली.
करुळ तपासणी नाक्यावर बुधवारी पोलिस हवालदार नितीन खाडे ड्युटीवर होते. रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास वैभववाडीकडून कोल्हापूरकडे जाणारा ट्रक (क्रमांक एमएच १२ एचडी २६४४) करुळ तपासणी नाक्यावर आला. हवालदार खाडे यांनी हा ट्रक तपासणीकरिता थांबविला. ट्रकचालक अमीर गुलाब तांबोळी आणि सहाय्यक रोहित रोहिदास समदडे (रा. पाटोदा, ता. उस्मानाबाद) या दोघांकडे विचारणा केली. यावेळी ट्रकमध्ये पाहणी केली असता तेलाचे डबे दिसून आले. त्यांनी तेलाचे डबे तपासून पाहिले असता आतील बाजूला गोवा बनावटीची दारू आढळून आली. ही माहिती त्यांनी पोलिस निरीक्षक अमित यादव यांना दिल्यानंतर आणखी काही कर्मचारी करुळ तपासणी नाक्यावर आले. त्यांनी दारू असलेला ट्रक वैभववाडी पोलिस ठाण्यात आणला. ट्रकमध्ये असलेल्या दारूची तपासणी केली असता ती १२ लाख रुपये किंमतीची दारू असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ट्रकसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी अमिर तांबोळी आणि रोहित पाटोदा या दोघांवर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस हवालदार मारुती साखरे करीत आहेत.
चौकट
नियमित दारू वाहतुकीची चर्चा
गोवा बनावटीच्या दारूची ट्रक, टेम्पो, आराम बसमधून नियमित वाहतूक होत असल्याची चर्चा आहे. आराम बसमध्ये विविध जागा निर्माण करून दारूची वाहतूक केली जाते. गाडीत असलेल्या प्रवाशांचा रोष ओढवू नये, यासाठी पोलिस गाड्यांची तपासणी करीत नाहीत, अशी देखील चर्चा आहे. गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी जिल्हा हद्दीवर असलेल्या तपासणी नाक्यावर केली जाते; परंतु आज करुळ तपासणी नाक्यावर पकडण्यात आलेला ट्रक तेथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या नजरेतून कसा काय सुटला, याची देखील चर्चा वैभववाडीत सुरू होती.