बाजार अन्यत्र तर भाजपचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार अन्यत्र तर भाजपचा विरोध
बाजार अन्यत्र तर भाजपचा विरोध

बाजार अन्यत्र तर भाजपचा विरोध

sakal_logo
By

88128
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना संजू परब. बाजूला सत्यवान बांदेकर. (छायाचित्र ः रुपेश हिराप)


बाजार अन्यत्र तर भाजपचा विरोध

संजू परब; केसरकरांनी जनतेची दिशाभूल करू नये

सावंतवाडी, ता. १० ः एका दिवसाच्या आठवडा बाजाराने मोती तलावाचे सौंदर्य बाधित होणार नाही. महिलांना होणारा त्रास आणि गैरप्रकार लक्षात घेता तलावाची जागा योग्य आहे. होळीच्या खुंटावर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे बाजार अन्यत्र हलविल्यास भाजपचा कडाडून विरोध राहील. केसरकरांचा दहशतवादाचा मुद्दा आता संपला. त्यांनी शहराच्या सौंदर्यावर येऊन जनतेची दिशाभूल करू नये, अशी टिकाही माजी नगराध्यक्ष तथा भाजपा प्रवक्ते संजू परब यांनी केली.
संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विनोद सावंत, सत्यवान बांदेकर उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘मंत्री केसकर आणि अलीकडेच आठवडा बाजार दुसरीकडे हलविण्याबाबत आपण ठाम असल्याचे जाहीर केले; मात्र, केसरकरांनी जनतेला फसवण्याचे सोडून द्यावे. जनता तुम्हाला कंटाळली आहे. एवढे दिवस दहशतवाद दहशतवाद करून राजकारण करणाऱ्या केसरकारांनी आता मोती तलावाच्या सौंदर्यावर बोलण्यास सुरुवात केली आहे. एका दिवसाच्या आठवड्या बाजाराने मोती तलावाचे सौंदर्य बाधित होणार नाही. ज्यावेळी आठवडा बाजार भरतो, त्यानंतर ताबडतोब पालिका प्रशासनाकडून त्या ठिकाणी स्वच्छता केली जाते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अस्वच्छता तेथे होत नाही. पूर्वी ज्या ठिकाणी हा बाजार भरत होता, तेथे महिला वर्गांना होणारा त्रास, त्यांच्या बाबतीत होणारे गैरप्रकार व अन्य गोष्टींचा विचार करून हा आठवडा बाजार तलावाच्या काठी भरवण्यात आला. गेली दोन वर्ष कुठल्याही प्रकारची तक्रार न येता हा आठवडा बाजार येथे सुरळीत सुरू आहे. व्यापारी वर्ग, नागरिकांनाही हा बाजार योग्य आणि सोयीचा वाटतो. त्यामुळे केसरकारांनी जनतेला दिलेली आश्वासने आणि रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतच बोलावे.’’
श्री. परब पुढे म्हणाले, ‘‘आम्ही सत्तेत आल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आठवडा बाजार तलावाकाठी भरवण्याबाबत निर्णय घेतला होता. तसा ठरावाही आम्ही कौन्सिलमध्ये घेतला आहे. सद्यस्थितीत हा आठवडा बाजार होळीचा खुंठ येथे हलविण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र, तेथील जागेचा विचार करता तेथे असणारी स्वच्छतागृहांची वानवा तसेच मुख्य बाजारापासून ही जागा दूर असल्याने तेथे रिक्षा आदींबाबत होणारी गैरसोय हे विषय प्रामुख्याने पुढे येणार आहेत. त्यामुळे तलावाकाठचा आठवडा बाजार दुसरीकडे हलविताना आम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा; अन्यथा भाजपचा त्याला विरोध राहणार आहे.’’
--------
88129
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना अॅड. संदीप निंबाळकर. शेजारी महेश परुळेकर आदी.


फलकबाजीमुळे तलावाचे
विद्रूपीकरण होत नाही का?

हॉकर्स फेडरेशन; बाजाराची जागा बदलू नका

सांवतवाडी, ता. १० ः मोती तलावाच्या सौंदर्याला बाधा पोहचविण्याचा भाजी विक्रेत्यांचा कुठलाही उद्देश नाही आणि यापुढेही असणार नाही; मात्र एका दिवसाच्या बाजाराने तलावाचे विद्रूपीकरण होत असेल तर तलावाकाठी लावण्यात येणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बॅनरमुळे तलावाचे विद्रूपीकरण होत नाही का? असा प्रश्न हॉकर्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदिप निंबाळकर यांनी केला.
ग्राहक आणि व्यापाऱ्यांना नवीन जागा मान्य असेपर्यंत आठवडा बाजार तलावाच्या काठावरुन हलवू नका; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेली उभा बाजाराची जागा पुन्हा द्या, अशी भूमिकाही अॅड. निंबाळकर यांनी स्पष्ट केली.
येथील श्रीराम वाचन मंदिरमध्ये ॲड. निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी हॉकर्स संघटनेचे सेक्रेटरी महेश परुळेकर, व्यापारी नाजिम पटेल, मजित मुल्ला आदी उपस्थित होते. ॲड. निंबाळकर म्हणाले, ‘‘मंत्री केसरकर यांनी तलावाचे वैभव असलेल्या मोती तलावाचे विद्रूपीकरण हा विषय पुढे आणला आहे; परंतु, या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेत्यांचा मोती तलावाच्या सौंदर्याला बाधा पोहोचण्याचा कुठलाच हेतू नाही आणि यापुढेही राहणार नाही. एक दिवसाच्या आठवडा बाजाराने जर तलावाचे विद्रूपीकरण होत असेल तर कित्येक महिने आठवडे तलावाच्या काठी राजकीय पदाधिकाऱ्यांचे मोठ-मोठी पोस्टर बॅनर लावल्याने विद्रूपीकरण होत नाही का? केवळ गरिबांचा प्रश्न आला की विद्रूपीकरण आणि श्रीमंतांचा प्रश्न आला की विद्रूपीकरण नाही, हे कुठेतरी चुकीचे आहे. सध्याच्या ठिकाणी असलेला बाजारामुळे जवळपास २०० ते ३०० व्यापाऱ्यांना रोजगार उपलब्ध होतो तसेच नागरिकांना स्वस्त भाजी उपलब्ध होते. त्यामुळे ग्राहकांचा व व्यापाऱ्यांचा विचार करता सोयीचा असणाऱ्या जागेचा विचार व्हावा. स्वच्छतेचा भाग लक्षात घेता त्याबाबत गांभीर्य राखल्या जाईल. पालिकेने अन्य नियम लादल्यास त्याचेही पालन केले जाईल. मात्र, आठवडा बाजार दुसरीकडे हलविताना व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय व्हावा."
ते पुढे म्हणाले, "हॉकर्स संघटना ही सरकारमान्यता प्राप्त संघटना आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून कुठल्याच निर्णयात फेरीवाल्यांना सामावून घेतले जात नाही. जर फेरीवाल्यांना सामावून घेतल्यास एखादा चांगला निर्णयही होऊ शकतो. मात्र, बऱ्याच वेळा प्रशासन स्वतःच निर्णय घेते. त्यामुळे वाद निर्माण होतात. आता बाजाराची जागा बदलताना किंवा निश्चित करताना आधी व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बैठक आयोजित करावी. आम्ही सुद्धा लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मते, त्यांच्याशी हितगुज करून सत्य समोर आणणार आहोत. मात्र, जोपर्यंत ग्राहकांना, विक्रेत्यांना आठवडा बाजाराची जागा मान्य होत नाही, तोपर्यंत तलावाकाठचा आठवडा बाजार अन्यत्र हलवू नये. अन्यथा शहरातील उभा बाजार येथे जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडा बाजाराला मान्यता दिली आहे. तेथेच पुन्हा एकदा आठवडा बाजाराची जागा द्यावी.’’
---------
चौकट
मुख्याधिकारी सहमत; मात्र...
हॉकर्स संघटनेच्या माध्यमातून मुख्याधिकारी जंयत जावडेकर यांची भेट घेतली असता, मोती तलावाच्या काठावरील आठवडा बाजाराबाबत तेही सहमत आहेत; मात्र, वरिष्ठांचे आदेश किंवा मंत्री महोदयांची सूचना आल्यास आपल्याला ते पाळावे लागतील, असे त्यांनी सांगितल्याचे संघटनेचे सेक्रेटरी श्री. परुळेकर यांनी सांगितले.