
‘शिवराई’ देते महाराजांची अनुभूती
88134
तळेरे ः शिवराई नाणे दाखविताना निकेत पावसकर.
‘शिवराई’ देते महाराजांची अनुभूती
राजा जाधव; पावसकरांच्या संग्रहालयात नाण्यांचा खजिना
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १० ः छत्रपती शिवाजी महराजांनी शिवराई नाणे कदाचित प्रत्यक्ष हातात घेतले नसेल; मात्र, त्यावेळी स्वराज्यातील मावळ्यांनी ही नाणी हाताळली आहेत. म्हणजेच अप्रत्यक्ष महाराजांचा स्पर्श या नाण्यांना झाला आहे. त्यामुळे ही नाणी जपून ठेव, असा सल्ला येथील नाणी संग्राहक आणि संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांना मुंबई येथील शिवकालीन नाण्यांचे संग्राहक राजा जाधव यांनी दिला.
श्री. पावसकर यांच्या अक्षरघराला श्री. जाधव यांनी भेट दिली. त्यांनी शिवराई नाण्यांसह इतर अनेक ऐतिहासिक नाणी पावसकर यांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जाधव यांच्याकडे ५०० पेक्षा जास्त शिवराई तर ऐतिहासिक १५ हजारपेक्षा जास्त दुर्मीळ नाणी संग्रहात आहेत. या भेटी दरम्यान जाधव यांनी पावसकर यांना कुशान-१ व २, वैष्णोदेवी नाणे, १९७० ची उलटा सूर्य व कमळ असलेली नाणी, दिदारानी काश्मीर, नागपुर भोसला, महमद बीन तघलघ (१२०० ते १४००), हैद्राबाद निझान (चांदीचे नाणे), होळकर इंदौर (चांदीचे नाणे) आणि शिवराई अशा ३८ दुर्मीळ आणि ऐतिहासिक नाण्यांचा खजिना भेट दिला. पावसकर यांच्याकडे विविध १५ देशांच्या नाणी आणि नोटांसह अत्यंत दुर्मीळ नाणी आणि नोटा संग्रहात आहेत. जाधव यांनी दिलेल्या शिवराई या माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ‘शिवराई’ शिवजयंतीला देवघरात पुजेला ठेवणार आहे, अशी माहिती पावसकर यांनी दिली.