
देवगडात भाजपचे सुडाचे राजकारण
88466
देवगड ः येथे संतोष तारी यांनी माध्यमांशी संवाद साधला. बाजूला निनाद देशपांडे. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
देवगडात भाजपचे सुडाचे राजकारण
संतोष तारी; नगरपंचायतीचा निधी अन्यत्र वळवल्याची खंत
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ११ ः राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून सहाय अनुदान योजनेतंर्गत चालू आर्थिक वर्षात येथील देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध नऊ विकास कामांसाठी सुमारे २ कोटी ७५ लाखाचा निधी दिला होता; मात्र भाजपकडून सुडाचे राजकारण करून हा निधी अन्य कामांसाठी वळवला आहे. यामुळे शहरातील नागरिकांवर अन्याय झाला असल्याची टीका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सत्ताधारी नगरसेवक संतोष तारी यांनी केली आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या प्रभागातील कामे वगळल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विकास निधीच्या अनुषंगाने श्री. तारी येथील संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी निनाद देशपांडे उपस्थित होते. श्री. तारी म्हणाले, “राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी शासनाकडून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कामांसाठी सुमारे २ कोटी ७५ लाखाचा निधी दिला गेला होता. यामध्ये जामसंडे वस्तीमधील पूल (३० लाख), दिर्बादेवी मंदिरकडे जाणारा पूल (६० लाख), जामसंडे येथे मोफत व्यायामशाळा उभारणे (३० लाख), आनंदवाडीकडे मुणगेकरनगरीतून जाणारा रस्ता (७० लाख) , दूरसंचार कार्यालयाकडून जाणारा रस्ता (२० लाख), तारामुंबरीमधील रस्त्याची उंची वाढवणे (१५ लाख), जामसंडे स्मशानभुमीमधील चबतुरे आणि शेड सुधारणे (१० लाख), मळई स्मशानभुमीमधील चबतुरे आणि शेड सुधारणे (१० लाख), मळई उतारावरील रस्ता सुधारणे (४० लाख) आदी विकास कामांचा समावेश होता. मात्र आताच्या भाजप शासनाकडून राजकारण करीत हा निधी अन्य कामांकडे वळवण्यात आला आहे. आपली विकास कामांची यादी रद्द करून नवीन यादीद्वारे कामे सुचवण्यात आली आहेत. आम्ही घेतलेली नऊ कामे सर्वसमावेशक आणि स्थानिक जनतेच्या हिताची होती. मात्र भाजपने कामे बदलून सुडाचे राजकारण केले आहे.”
.......................................
चौकट
भाजपने जाणीव ठेवावी
विकास कामांची यादी बदलली असली तरीही नगरपंचायत कार्यक्षेत्रासाठी दिलेला सुमारे २ कोटी ७५ लाखाचा निधी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिला आहे याची भाजपने जाणीव ठेवावी. भाजपच्या तत्कालीन पराभूत उमेदवारांच्या प्रभागातील कामे रद्द केली असली तरी तेथे भाजपचे काही मतदार आहेत. योग्यवेळी ते याबाबतचा निर्णय घेतील असा टोलाही तारी यांनी लगावला.