रत्नागिरी पालिकेकडून 48 मालमत्ता सील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी पालिकेकडून 48 मालमत्ता सील
रत्नागिरी पालिकेकडून 48 मालमत्ता सील

रत्नागिरी पालिकेकडून 48 मालमत्ता सील

sakal_logo
By

पान १ साठी

८८८६७

रत्नागिरी पालिकेकडून ४८ मालमत्ता ‘सील’
---
घरपट्टी थकबाकीदार; २२ जणांची नळजोडणी तोडली, ६.८० कोटी कर वसूल
रत्नागिरी, ता. १३ : पालिकेने आता घरपट्टी वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. घरपट्टी थकविलेल्या शहरातील ४८ मालमत्ता जप्त केल्या; तर चार ते सहा वर्षे पाणीपट्टी थकविलेल्या २२ जणांच्या नळजोडण्या पथकाने तोडल्या. वेळीच थकबाकी भरली नाही तर ही कठोर कारवाई अशी पुढे सुरू राहणार आहे. आतापर्यंत सहा कोटी ८० लाख एवढी म्हणजे ६२ टक्के घरपट्टी वसुली झाल्याचे वसुली पथकाने सांगितले.
पालिकेची आर्थिक स्थिती दोलायमान आहे. मागील दोन वर्षे कोरोना संकटामुळे घरपट्टी, पाणीपट्टी वसुली म्हणावी तशी समाधानकारक झाली नाही. कोरोना संकट संपुष्टात आल्यावर थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी आरोग्य विभागाच्या घंटागाड्यांवरून विनंती करण्यास सुरुवात झाली. घंटागाड्यांवरील या ध्वनिक्षेपकांवरून कारवाईचाही इशारा दिला जात होता. तरीही ग्राहकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. अजूनही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. मार्चअखेर असल्याने पालिकेने आर्थिक वर्षे संपण्यापूर्वी थकबाकी वसुलीसाठी आता कठोर पावले उचलली आहेत. पालिकेने वसुलीसाठी तीन पथके तयार केली असून, आजपासून थकबाकीदारांवर कारवाई सुरू करण्यात आली.
पालिकेच्या कर विभागाचे अधिकारी नरेश आखाडे यांच्या नेतृत्वाखाली सागर सुर्वे आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई सुरू केली आहे. घरपट्टीचे सुमारे १० कोटी वसुलीचे लक्ष्य आहे. त्यातील सहा कोटी ८० लाख रुपये वसूल झाले असल्याचे आखाडे यांनी सांगितले. दरम्यान, पाणीपट्टीही मोठ्या प्रमाणात थकीत आहे. पहिल्या टप्प्यात चार ते सहा वर्षे पाणीपट्टी थकविणाऱ्या मोठ्या रकमेच्या थकबाकीदारांची नळजोडणी तोडली. शहरातील अशा २२ जणांना नळजोडणी तोडून पालिकेने दणका दिला आहे. घरपट्टी थकविणाऱ्या ४८ मालमत्ता ‘सील’ करण्यात आल्या. ही करवसुली आणि कारवाई अशीच सुरू राहणार आहे, असे वसुली अधिकाऱ्यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात
तीन जप्तीपथके कार्यरत
१० कोटींचे उद्दिष्ट
६ कोटी ८० लाख वसूल
६२ टक्के झाली वसुली