
सत्यशोधक संघटनेचा संपाला पाठिंबा
८९०६९
सत्यशोधक संघटनेचा संपाला पाठिंबा
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
कणकवली, ता. १४ : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला सत्यशोधक शिक्षक सभेच्या सिंधुदुर्गतर्फे आज पाठिंबा जाहीर केला. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी आविशकुमार सोनाने यांना दिले.
श्री. सोनाने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य खडतर जाणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू व्हायला हवी. जुनी पेन्शन लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीपीएफची सुविधा आहे. यात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कुठल्याही प्रकारची कपात केली जात नाही. निवृत्तीनंतर ग्रॅच्युईटी मिळते. सेवा काळात मृत्यू झाल्यास वारस कुटुंबाला निवृत्तिवेतन मिळते. महागाई भत्त्यानुसार व वेतन आयोगानुसार पेन्शन वाढत जाते. या उलट २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जीपीएफ सुविधा नाही. वेतनातून १० टक्के रक्कम कपात केली जाते. ग्रॅच्युईटची सुविधा नाही. कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू नाही. महागाई भत्त्यानुसार पेन्शन रक्कम वाढत नाही. या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व सरकारी कर्मचारी संपावर गेले असून त्याला सत्यशोधक संघटनेचा पाठिंबा असल्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश पेडणेकर, सचिव शंकर जाधव यांच्यासह जितेंद्र पेडणेकर, राम माने, गौतम तांबे, सुलभा तांबे, अमोल कांबळे, योगेश सपकाळ, संतोष पेडणेकर, स्वाती जाधव आदी उपस्थित होते.