तेलींच्या ''फिरण्याची'' नाराजी कोणाकडे मांडणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेलींच्या ''फिरण्याची'' नाराजी कोणाकडे मांडणार?
तेलींच्या ''फिरण्याची'' नाराजी कोणाकडे मांडणार?

तेलींच्या ''फिरण्याची'' नाराजी कोणाकडे मांडणार?

sakal_logo
By

swt1423.jpg
89045
सावंतवाडी : येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पुंडलिक दळवी. बाजूला देवा टेमकर, ॲड. सायली दुभाषी, हिदायतुल्ला खान, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, चित्रा देसाई आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

राष्ट्रवादीमुळेच केसरकरांचे अस्तित्त्व
पुंडलिक दळवीः तेलींच्या ‘फिरण्याची’ नाराजी कोणाकडे मांडणार?
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ः राष्ट्रवादी पक्षामुळेच मंत्री केसरकर व अनारोजीन लोबो यांचे राजकीय अस्तित्व निर्माण झाले. त्यामुळे जन्मदात्या पक्षाला तुम्ही अस्तित्व विचारात असाल तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. अर्चना घारे मतदार संघात फिरल्या हे मंत्री केसरकरांच्या जिव्हारी लागते. आता भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली सुद्धा आमदारकीसाठी तुमच्या मतदारसंघात फिरत आहेत. ही नाराजी मुख्यमंत्र्यांकडे मांडणार की पुन्हा पक्ष सोडून जाणार, असा टोला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आज येथे लगावला. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी शहराध्यक्ष देवा टेमकर, महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, उद्योग व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी, उद्योग व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, उद्योग व्यापार तालुका उपाध्यक्ष याकूब शेख, पूजा दळवी आदी उपस्थित होते.
श्री. दळवी पुढे म्हणाले, ‘‘मंत्री केसरकारांनी यापूर्वी दहशतवादाच्या मुद्द्यावरून राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेतली; मात्र आज ज्यांच्यावर दहशतवादाचे आरोप केले, त्यांच्याच ओसरीला जाऊन बसल्यामुळे त्यांच्याकडे टीका करण्यासारखे काहीच उरले नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादीवर आणि आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत. दुसरीकडे त्यांची पाठराखण करणारे स्थानिक नेते सुद्धा आमच्यावर टोकाचे आरोप करीत आहेत; मात्र हे त्यांना शोभत नाही. केसरकर यांनी मतदारसंघात केलेला सर्वाधिक जास्त विकास राष्ट्रवादीकडून झाला आहे. नंतरच्या काळात त्यांनी किती विकास केला, हे जनतेने सुद्धा पाहिले आहे. आज आमच्या नेत्या अर्चना घारेंनी मतदार संघात लावलेला सामाजिक कार्याचा धडाडा पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणून ते आज त्यांच्यावर टीका करत आहेत. त्या मतदार संघात फिरल्या; मात्र ठाकरेंना काहीच वाटले नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचे स्वातंत्र्य आहे. जर अर्चना घारे मतदार संघात फिरल्याने केसरकरांच्या जिव्हारी लागले, तर आज तेली सुद्धा मतदार संघात फिरत आहेत. ही नाराजी ते मुख्यमंत्री शिंदेकडे व्यक्त करणार की पुन्हा हा पक्षही सोडून जाणार, असा सवाल उपस्थित होतो.’’
श्री. टेमकर यांनी, ‘‘अनारोजीन लोबो राष्ट्रवादीत असताना आमच्याकडून त्यांचा योग्य सन्मान झाला होता. त्यांना महिला जिल्हाध्यक्ष पदासह फिरण्यासाठी गाडी सुद्धा दिली होती; मात्र राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेल्यानंतर त्यांना सायकल तरी मिळाली का, असा प्रश्न उपस्थित केला. पक्ष सोडल्यानंतर पक्षाच्या आठवणीत रडणाऱ्या लोबो आज पक्षावर टीका करत आहेत. ज्या पक्षाने जन्म दिला, त्याचे ऋण त्या टीका करताना विसरत आहेत. मग त्यावेळी लोबोंच्या डोळ्यातून वाहिलेले अश्रू मगरीचे होते का, असा टोलाही त्यांनी लगावला. तर घारेंवर उपऱ्याची टीका करणे एक महिला म्हणून लोबोंना शोभत नाही. त्या घारे यांना विद्यार्थी दशेपासून पाहत आल्या आहेत. याचा लोबोंना विसर पडला असेल तर घारे यांचे शाळेचे दाखले, सातबारा पाठवून देतो, असा टोला सौ. बाबर-देसाई यांनी लगावला.
सौ. दुभाषी यांनी आमच्या नेत्या घारे-परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे येथे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निवडून येत चांगले काम केले आहे. त्यांचे शालेय शिक्षण येथेच झाल्यामुळे त्यांच्यावर उपऱ्याची टीका करणे योग्य नाही. महिलादिनी महिलांचा सन्मान करण्याची केलेली भाषणे लोबो विसरल्या का, असा सवाल उपस्थित केला.

चौकट
... तर राजकारण सोडेन
पुंडलिक दळवी मंत्री केसरकर यांच्याकडून कामे घेऊन जातात, असे वक्तव्य माजी नगरसेविका अनारोजिन लोबो यांनी केले होते. यावर मी केसरकरांकडून वैयक्तिक स्वार्थाचे एक जरी काम करून घेतले असल्यास ते जाहीर करा. त्याच दिवशी राजकीय संन्यास घेईन, असे प्रत्युत्तरात्मक आव्हान दळवी यांनी दिले.