
‘शामराव पेजे’ योजनेचे १९ प्रस्ताव मंजूर
‘शामराव पेजे’ योजनेचे १९ प्रस्ताव मंजूर
सिंधुदुर्गनगरी : शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळाची १० लाख वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या १९ कर्ज प्रस्तावांना आणि रुपये १ लाख थेट कर्ज योजनेच्या एका कर्ज प्रस्तावाला, तसेच वसंतराव नाईक महामंडळाचे १० लाख वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतील एका कर्ज प्रस्तावाला लाभार्थी निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतची माहिती जिल्हा व्यवस्थापक प्रीती पटेल यांनी दिली. बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मेश्राम, समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे, कौशल्य विकास व रोजगार विभागचे सहायक आयुक्त बिटोडे, आयटीआयचे प्रतिनिधी गवस आदी उपस्थित होते.
................
शिष्यवृत्ती अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध
सिंधुदुर्गनगरी ः अंतरिम उत्तरसूचीमध्ये विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारीत केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असून याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलेजा दराडे यांनी केले आहे. पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेची इयत्ता व पेपरनिहाय अंतरिम तात्पुरती उत्तरसूची १७ फेब्रुवारीला संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती.
--
युवा स्वयंसेवक पदासाठी मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी ः भारत सरकार युवा कार्य क्रीडा मंत्रालयातर्फे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी २३ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील युवक व युवतींनी www.nyks.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन व नेहरू युवा केंद्र ओरोस येथे ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकाऱ्यांनी केले आहे. या पदासाठी शिक्षण पात्रता कमीत कमी दहावी पास असून अर्जदार नियमित विद्यार्थी किंवा नोकरी करणारा नसावा. अधिक माहितीसाठी जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
...............
रॉकेल विक्रीचे दर जाहीर
सिंधुदुर्गनगरी ः मार्चकरिता जिल्ह्यात किरकोळ रॉकेल विक्रीचे सुधारीत दर जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी जाहीर केले आहेत. तालुकानिहाय घाऊक व किरकोळ केरोसीन विक्रीचे दर प्रतिलिटर ७३.४० ते ७४.३० रुपये या दरम्यान राहणार आहेत.