
प्रशासकीय कामकाज ठप्पच
89250
सिंधुदुर्गनगरी ः संपावरील शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी केलेले धरणे आंदोलन.
89251
सिंधुदुर्गनगरी ः कर्मचारी संपामुळे कार्यालयांमध्ये पसरलेला शुकशुकाट.
प्रशासकीय कामकाज ठप्पच
---
कर्मचाऱ्यांचा संप सुरू; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ ः जुनी पेन्शन लागू करा, या प्रमुख मागणीसाठी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. दुसऱ्या दिवशीही जिल्हाभरातील सरकारी आस्थापनांचा कारभार ठप्प होता. जवळपास ९८ टक्के कर्मचारी संपात सक्रिय आहेत.
राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. शासनाकडून जुनी पेन्शन योजना लागू होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. आंदोलनात सर्व संघटनांनी सहभाग घेतला. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
संपात जिल्ह्यातील विविध ६२ संघटनांचे सुमारे १७ हजार कर्मचारी सहभागी आहेत. कार्यालयात केवळ दोन टक्के कर्मचारी आहेत. त्यामुळे संप यशस्वी झाल्याचा दावा समितीने केला. आजही जिल्हाभरातील प्रशासकीय कामकाज ठप्प होते. शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा, पीएफआरडीए कायदा रद्द करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, रिक्त पदे तत्काळ भरा, आठवा वेतन आयोग स्थापन करा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करू नका, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवा, खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करा आदी मागण्यांसह आंदोलन करण्यात आले.