
मुख्यमंत्र्यांनी गुहागरवासीयांच्या भावनांचा आदर केला
rat१५p२२.jpg
L८९२४४
गुहागरः विकास आराखड्याबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित गुहागर नागरिक मंचच्या समितीचे सदस्य.
मुख्यमंत्र्यांकडून गुहागरवासीयांच्या भावनांचा आदर
अमरदीप परचुरे; अवघ्या १३ दिवसांत अनुकूल निर्णय
गुहागर, ता. १५ ः विकास आराखड्याबाबत गुहागरवासीयांच्या भावना पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोचवल्या. मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या भावनांचा आदर करत तत्क्षणी शहरवासीयांच्या निवेदनावर शेरा मारत नगरविकास खात्यांचे सचिव भूषण गगराणी यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठवले. आता नगरविकास खात्याकडून पत्र आले की, विकास आराखडा रद्द की स्थगिती मिळाली, हे समजेल; मात्र अवघ्या १३ दिवसांत आपण अनुकूल निर्णयापर्यंत पोचलो आहोत, अशी माहिती गुहागर नागरिक मंचचे अमरदीप परचुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुहागर शहराच्या विकास आराखड्यावर जनतेच्या मागण्यांचा विचार केल्याशिवाय कार्यवाही होणार नाही, असे सध्याचे चित्र आहे. या टप्प्यापर्यंत कसे पोचलो याची माहिती देताना परचुरे म्हणाले, शहर विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचा अभ्यास करून २ मार्चला दीपक कनगुटकर, अमरदीप परचुरे, ओंकार गद्रे, अद्वैत जोशी, प्रथमेश दामले यांनी रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी आणि नगररचनाकार रत्नागिरी यांना भेटून निवेदन दिले. ३ मार्चला लोकांच्या सोयीकरिता सोप्या भाषेतील हरकतींचे वेगवेगळे अर्ज तयार केले आणि नागरिकांपर्यंत पोचवले. ९ मार्चला गुहागर नागरिक मंच म्हणून शहरवासीयांची बोलावली. या सभेत नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून नागरिकांच्या सह्यांचे निवेदन तयार केले. याच सभेत गुहागर शहराच्या सर्व भागातील सदस्यांना घेऊन एक समिती तयार केली. या समितीने १३ मार्चला मुंबईत पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन गुहागर शहरवासीयांचे निवेदन दिले. त्याच दिवशी सामंत यांनी आपले पत्र जोडून गुहागरवासीयांचे निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठवले आणि गुहागरातील शहर विकास आराखड्याबाबतच्या जनभावना मुख्यमंत्र्यांपर्यत पोचवल्या. मुख्यमंत्र्यांनीदेखील तातडीने या पत्रावर शेरा मारून नगरविकास खात्याचे मुख्य सचिव गगराणी यांना त्वरित कार्यवाही करण्यास सांगितले. आता नगरविकास खात्याचे पत्र आल्यावर शहर विकास आराखडा रद्द झाला की, त्याला तात्पुरती स्थगिती मिळाली हे स्पष्ट होईल; मात्र या आराखड्याला मंजुरी मिळणार नाही हे नक्की झाले आहे.
या परिषदेत दीपक कनगुटकर, अद्वैत जोशी, राज विखारे, मयुरेश कचरेकर यांनीदेखील विकास आराखड्यातील त्रुटी सांगितल्या. या वेळी गुहागर नागरिक मंचचे सदस्य उपस्थित होते.
-------------------------