
मळगावजवळ तरुणीला मारहाण
मळगावजवळ तरुणीला मारहाण
पोलिसांकडून समज; गोव्याहून परतताना प्रकार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ : जीवाचा गोवा करण्यासाठी गेलेल्या बेळगाव येथील दोघा तरुणांनी आपल्या सोबत असलेल्या एका तरुणीला वाटेतच मारहाण केली. त्या तरुणीने गाडीतून बाहेर उडी मारून पलायन केले. हा प्रकार काल (ता. १४) रात्री साडेनऊच्या सुमारास मळगाव रेल्वेस्थानकाजवळ घडला. मुलीला मारहाण होत असल्याचे पाहून त्या ठिकाणी दोनशेहून अधिक ग्रामस्थ जमले. त्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले; परंतु तिघेही एकमेकांचे मित्र असल्यामुळे त्यांना समज देऊन सोडून दिले, असे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले. हा सर्व प्रकार मोटारीत उलटी केल्याच्या रागातून झाल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित तरुण मित्रमंडळी गोवा येथे गेली होती. त्यानंतर माघारी परतत असताना निरवडे येथे त्यांनी अचानक गाडी थांबवली आणि त्या मुलीला मारहाण सुरू केली. त्यामुळे मुलीने मोटारीतून बाहेर उडी मारत तेथून पलायन केले. मी तुमच्याबरोबर येणार नाही, असे सांगत ती पळत होती. यावेळी त्यातील एक तरुण त्या मुलीला तू आमच्याबरोबर चल, नंतर काय ते बोलू, अशी विनंती करत होता. हा प्रकार त्या ठिकाणाहून जाणाऱ्या प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तरुणांना जाब विचारला. त्यानंतर पोलिस दाखल झाले. त्यांनी सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. यावेळी त्या मुलीने गाडीत उलटी केल्याच्या रागातून हा प्रकार झाल्याचे तरुणांनी सांगितले. त्यानंतर चौकशी करून त्यांचे आधारकार्ड पाहून जबाबवजा नोंद करून त्यांना सोडून दिले.