राजापूर ः तळ्यासह विहिरीतील गाळ उपसा करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः तळ्यासह विहिरीतील गाळ उपसा करणार
राजापूर ः तळ्यासह विहिरीतील गाळ उपसा करणार

राजापूर ः तळ्यासह विहिरीतील गाळ उपसा करणार

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat16p5.jpg-KOP23L89389 राजापूर ः राजापुरातील रानतळे येथील ऐतिहासिक शिवकालीन तळ्यातील गाळ उपसा व पाणीसाठ्याची पाहणी करताना प्रशांत भोसले, जितेंद्र जाधव, अशफाक हाजू, सौरभ खडपे आदी.

शिवकालीन तळ्यासह विहिरीतील गाळ उपसा
मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी ः पर्यायी योजना लवकरच
राजापूर, ता. १६ ः शहरातील रानतळे येथील पाणीटंचाई व ऐतिहासिक शिवकालीन तळ्यातील गाळ उपसा कामाची मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी पाहणी केली. या जॅकवेलवर अवलंबून असलेल्या नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ऐतिहासिक शिवकालीन तळ्यातील आणि जॅकवेलच्या विहिरीतील गाळ उपसा करून पाणीसाठा वाढवण्यात येणार आहे. भविष्यात सुरळीत पाणीपुरवठा करता यावा व पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजनेचा विचार करून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले.
शहरातील रानतळे परिसरात असलेल्या ऐतिहासिक शिवकालीन तळ्याला लागूनच असलेल्या एक विहीरीवरून रानतळेसह साखरकरवाडी परिसराला पाणीपुरवठा केला जातो. याच ठिकाणी ऐतिहासिक शिवकालीन तळ्याच्या सुशोभिकरणाचे कामही सुरू आहे. या तळ्यात पाणीसाठा व्हावा यासाठी तळ्यातील गाळही उपसण्यात येत आहे; मात्र गेले काही दिवस या भागात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून तक्रारी येत आहेत, तर पाणीसाठ्याच्या लगतच अनधिकृत बोअरवेलही मारण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पालिकेने तो तत्काळ थांबवला. पाणीटंचाईमुळे या भागातील नागरिकांनी पाणी सोडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साखरकरवाडीला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. या प्रकारानंतर मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी रानतळे येथे जाऊन पाहणी केली. या प्रसंगी राजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अशफाक हाजू, माजी नगरसेवक सौरभ खडपे, नगर पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव उपस्थित होते. गाळ उपसा केल्याने तळ्यात पाणी साठू शकते. ते तपासून पिण्यायोग्य असेल तर या परिसराला दिले जाईल. जॅकवेलच्या विहिरीतील गाळ उपसा करून विहिरीत जास्तीत जास्त पाणीसाठा कसा होईल, हे पाहणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. वाढती लोकसंख्येचा विचार करता या परिसराबरोबरच जॅकवेलवर ज्या भागाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे, त्यांना स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना करता येते का याचीही चाचपणी केली जाईल असे भोसले यांनी सांगितले. पाण्याचा उद्भव आढळल्यास प्रस्ताव तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.