
टेरव सरपंचाविरोधात ग्रामस्थांचे उपोषण
rat१६२६.txt
बातमी क्र..२६ (टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
- RATCHL१६१.JPG ः
८९४३०
चिपळूण ः पंचायत समितीसमोर उपोषणास बसलेले टेरव ग्रामस्थ महिला.
टेरव सरपंचाविरोधात ग्रामस्थांचे उपोषण स्थगित
बीडीओंचे चौकशीचे आश्वासन ; शासकीय नियमांना बगल देत कामे
चिपळूण, ता. १६ ः तालुक्यातील टेरव ग्रामपंचायतीत मनमानी कारभार सुरू आहे. गेल्या चार-पाच वर्षाच्या कालावधीत शासकीय नियमांना फाटा देत विकासकामे झाली. सरपंच पदाचा गैरवापर करून शासकीय नियमाला हरताळ फासतात. विविध विकासकामांत ग्रामपंचायतीने शासकीय नियमांना बगल दिली. त्यामुळे १४ कामांची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी टेरव ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर उपोषण केले. तक्रार असलेल्या कामांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
टेरव कुंभारवाडी हनुमानमंदिर, तांदळेवाडीत विठ्ठल रखुमाई मंदिर, निम्मेगाव गणेशमंदिर व सुतारवाडी विश्वकर्मा मंदिर येथे पेव्हरब्लॉकच्या कामाची चौकशी, सौरदीप खरेदी व दुरुस्तीसाठी झालेला खर्च, कोरोना कालावधीत क्वारंटाइन सेंटर व शाळा नं. १ मधील सुविधांवर झालेला खर्च, कोरोना निर्बंधाकरिता ग्रामस्थांसाठी केलेली साहित्यखरेदी या साऱ्यांची चौकशी करावी. शाळा नं. १ साठी ७ लाख रुपये खर्चातून क्रीडांगण उभारण्यात आले. त्यात भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
लिंगेश्वर मंदिराकरिता जमिनमालकाच्या संमतीशिवाय विकासकामांवर झालेला खर्च, सरकारी स्मशानशेडच्या जागेवर अनधिकृतपणे पाण्याच्या टाकीचे बांधकाम व गरजू व्यक्तींच्या वैयक्तिक लाभांमध्ये घातलेला घोळ, ग्रामसभेची संमती न घेता गावात केलेली २ कोटीची कामे, पथदीप कामांवर केलेला खर्च आदी कामांची चौकशी करण्यात यावी तसेच ग्रामसेवकांची बदली करण्याचा ठराव १० फेब्रुवारी २०२३ च्या ग्रामसभेत झाला आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. त्याशिवाय २०२१-२३ मध्ये क वर्ग पर्यटनअंतर्गत गार्डनला मातीकाम व मंदिर परिसरात पेव्हरब्लॉक बसवण्यासाठी प्रत्येकी १५ लाख, जय भवानी मंदिर रस्ता ते तळेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी १५ लाख, जयभवानी वाघजाई मंदिर परिसरात संरक्षक भिंत व काँक्रिटीकरणासाठी २० लाखाचा निधी खर्च झाला. या तिन्ही कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून, त्याचीही सविस्तर चौकशी करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली.
यावर उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांनी चर्चा केली. त्यांनी तक्रारीवर सखोल चौकशी करून कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. या वेळी एकनाथ माळी, कृष्णा कुंभार, परशुराम फागे, विजय तांदळे, सोमा म्हालिम, विजय वास्कर, सचिन म्हालीम, राजेंद्र म्हालीम, अनंत कराडकर, प्रमिला फागे, दीप्ती फागे, सुरेश कदम, निधी म्हालीम, विनायक तांदळे, जयराम म्हालीम, पांडुरंग भारती, रमेश म्हालीम, पोपट आदवडे, रामचंद्र शिरकर यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.