
रत्नागिरी- श्री सुंकाई मंदिराचा आजपासून कलशारेाहण सोहळा
सड्येतील सुकाई मंदिराचा
आजपासून कलशारेाहण सोहळा
रत्नागिरी, ता. १६ ः तालुक्यातील सड्ये पिरंदवणे, वाडाजून ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री देवी सुंकाई देवस्थानचा कलशारोहण सोहळा शुक्रवारी (ता. १७) आणि शनिवारी (ता. १८) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार आहे. सडये, पिरंदवणे, वाडाजूनमधील ग्रामस्थांचे ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या श्री देवी सुंकाई देवस्थानचा ग्रामस्थांच्या, भाविकांच्या आणि दानशुरांच्या देणगीतून जीर्णोद्धार करण्यात आला. सुंकाई हे जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. ही देवी तांदळा स्वरूपात आहे. शुक्रवारी दुपारी २ वा. कलशारोहण सोहळ्याला सुरवात होणार आहे. सड्येतील अशोक कदम यांच्या निवासस्थानापासून कलशाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सडये, पिरंदवणे, वाडाजूनच्या ग्रामीण संस्कृती, परंपरांचे दर्शन घडणार आहे. सायंकाळी ४.३० वा. वे. मू. संदीप भावे यांच्या पौरोहित्याखाली राक्षोघ्न होम विधी करण्यात येणार आहे. १८ मार्चला सकाळी ७ वा. मंदिराची प्रासाद वास्तू व कलश प्रतिष्ठा करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ वा. कलशारोहण व सत्यनारायणाची पूजा व आरती होईल. दुपारी १२ वा. श्री देवी सुंकाई मंदिर जीर्णोद्धारासाठी योगदान देणार्या व्यक्तींचा कृतज्ञता सोहळा होईल. दुपारी १.२० पासून महाप्रसाद सुरू होईल. रात्री १० वा. कोल्हेवाडी येथील श्री सोळजाई नमन मंडळाचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होईल. या सोहळ्याला सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव सोमेश्वर सुंकाई आणि एण्डोवमेंट ट्रस्ट यांनी केले आहे.