
रत्नागिरी- संक्षिप्त
जाणीव फाउंडेशनतर्फे आज रक्तदान शिबिर
रत्नागिरी : जाणीव फाऊंडेशनतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात शुक्रवारी (ता. १७) सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अवधूत मुळ्ये, उमेश महामुनी यांच्याशी संपर्क साधावा.
मंदार खेर यांची रविवारी मुलाखत
रत्नागिरी : शहराजवळील शिरगाव येथील स्वगृही सेवा संस्थेमध्ये नर्मदा परिक्रमा अनुभव कथन यावर मंदार खेर यांची मुलाखत आयोजित केली आहे. येत्या रविवारी (ता. १९) दुपारी ३.३० वाजता त्यांची मुलाखत प्रवचनकार ओंकार मुळ्ये घेणार आहेत. शिरगाव येथील गणेशवाडीत स्वगृही सेवा संस्थेचा वृद्धाश्रम आहे. येथे हा कार्यक्रम होणार आहे. जास्तीत जास्त नर्मदाप्रेमी आणि इच्छुकांनी सर्वांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कॉक्लियर इंप्लांट मशिनसाठी आवाहन
रत्नागिरी : लाजूळ येथील कर्णबधीर मुलीच्या कॉंक्लियर इंप्लांट मशिनच्या प्रोसेसरसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. ओवी भिकाजी ओर्पे या कर्णबधीर दिव्यांग मुलीचे उजव्या कानाचे कॉक्लियर इंप्लांटची ८ लाख रुपयांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिला ऐकू येण्यास सुरवात झाली होती. त्यासाठी स्पीचथेरपी देखील चालू होती. दुर्दैवाने ५ मार्चला तिच्या कानाच्या मशीनचा प्रोसेसर प्रवासादरम्यान हरवला. ओवीच्या पालकांची प्रोसेसर खरेदी करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून तिला आर्थिक सहाय्याची गरज आहे. जेणेकरून तिचे पालक ३ लाख १२ हजार रुपये किमतीचा प्रोसेसर तिच्यासाठी खरेदी करू शकतील. याकरिता मदतीचे आवाहन आस्था सोशल फाउंडेशनने केले आहे.
शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे
महिलांच्या कायद्यासंदर्भात मार्गदर्शन
रत्नागिरी : येथील शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला विभागाकडून जागतिक महिला दिन फाटक हायस्कूलच्या सभागृहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमावेळी शुभांगी मुळ्ये यांनी प्रास्तविकात महिला दिनाचे प्रयोजन विशद करून आपण तो का व कसा साजरा करावा हे सांगितले. प्रमुख वक्त्या सुखिता भावे यानी स्त्रीयांबद्दलचे कायदे म्हणजेच हुंडा प्रतिबंधक कायदा, गर्भपात, स्त्रियांवरील अत्याचार व संरक्षण, कौटुंबिक हिंसाचार स्त्रियांचे कवटुंबीक मिळकतीतील हक्क या बाबत परिपूर्ण माहिती महिलांना दिली. त्यानंतर कविता वाचन फुगड्या, रंगांची उधळण वगैरे विविध कार्यक्रम उपस्थित महिलांनी केले. सूत्रसंचालन संघाच्या उपाध्यक्ष पद्मजा बापट यांनी केले.