
पावस बाजारपेठेतून एसटीच्या फेऱ्या सुरू
पावस बाजारपेठेतून
एसटीच्या फेऱ्या सुरू
विद्यार्थी, प्रवाशांना दिलासा ; प्रायोगिक तत्त्वावर फेऱ्या
पावस, ता. १७ः गेली दोन वर्षे पावस बाजारपेठमार्गे बंद असलेली एसटीची वाहतूक सातत्याच्या मागणीनुसार अखेर काही प्रमाणात सुरू करण्यात आल्याने प्रवासीवर्ग व विद्यार्थी यांच्यामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे एसटी सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे बाजारपेठमार्गे एसटी सेवा सुरू असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता; परंतु गेल्या वर्षभर कोरोनाचे सावट संपल्यानंतर सर्व जगजीवन सुरळीत सुरू झाल्यानंतर पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आली; परंतु पावस बाजारपेठमार्गे एसटी सेवा बंद केली होती. कारण, या मार्गावरील गोळप मोहल्ला परिसरामध्ये रस्त्यावर अनधिकृत बांधकामे, रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी वाहने उभी केली जात असल्याने तसेच वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा रस्ता खोदण्यात आल्यामुळे एसटी वाहतूक सुरू करणे कठीण बनले होते. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला; परंतु एसटी वाहतुकीच्यादृष्टीने हा मार्ग योग्य नसल्याकारणाने एसटी विभाग त्या मार्गावर एसटी सेवा सुरू करण्यास तयार नव्हते. कारण, त्या मोहल्ला परिसरातील लोकांचा संबंधित एसटीचालक आणि वाहकांना त्रास सहन करावा लागत होता. त्या कारणाने सेवा ठप्प ठेवली होती. अखेर स्थानिक ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन काही प्रायोगिक तत्त्वावर एसटी विभागाने दिवसभरात चार-पाच फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी जनता व विद्यार्थी यांना काही प्रमाणात फायदा होणार आहे.