
ठेकेदाराने अडकवलेल्या स्कूलबस ताब्यात घ्या
८९६७३
अंजनवेल ः उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेऊन युतीच्या कार्यकर्त्यांनी या लढ्याला पाठिंबा दर्शवला.
--
ठेकेदाराने अडकवल्या तीन स्कूलबस
विद्यार्थ्याचे हाल ; ग्रामस्थांचे उपोषण, अंजनवेल ग्रामपंचायतीची कार्यवाहीस टाळाटाळ
गुहागर, ता. १७ ः ठेक्याची रक्कम मिळाली नाही म्हणून ठेकेदाराने स्कूलबस ताब्यात ठेवल्या; मात्र या स्कूलबस ताब्यात घेण्यात ग्रामपंचायत अंजनवेल असमर्थ ठरली आहे. ग्रामपंचायतीने स्कूलबस ताब्यात घेऊन त्या शाळा व्यवस्थापन समितीच्या ताब्यात द्याव्यात. शाळा व्यवस्थापन समिती पुढील शाळेसाठीच्या स्कूलबस सुरू ठेवण्यास तयार आहेत, असे सांगूनही ग्रामपंचायत कार्यवाही करत नाही. त्यामुळे माजी सरपंच यशवंत बाईत, ९० ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांसह ग्रामपंचायतीसमोर उपोषण करत आहेत.
या उपोषणाला भाजपा-शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. भाजपचे तालुका सरचिटणीस सचिन ओक, चिटणीस साईनाथ कळझुणकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांच्यासह प्रभाकर शिर्के, प्रल्हाद विचारे यांनी एकत्र जाऊन उपोषणकर्त्या ग्रामस्थांची भेट घेतली. अंजनवेल ग्रामपंचायतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय स्कूल सुरू केल्यानंतर या शाळेला विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी तीन स्कूलबस दिल्या होत्या. या स्कूलबसचे आवश्यक भाडे ग्रामपंचायत आपल्या निधीतून खर्च करत होती. दरम्यान ३१ डिसेंबर २०२२ ला या तिन्ही स्कूलबस चालवण्याचा करार संपुष्टात आला. त्या वेळी स्कूलबस चालवण्याचा ठेका घेतलेल्या अजित साळवी यांना ठेक्याची रक्कम ग्रामपंचायतीने दिली नाही. त्यामुळे ठेकेदार साळवी यांनी अंजनवेल ग्रामपंचायतीच्या तिन्ही स्कूलबस स्वत:च्या ताब्यात ठेवल्या आहेत. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अडचणीचा विषय ठरला आहे; मात्र ठेकेदार साळवी यांना आवश्यक त्या ठेक्याची रक्कम देण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरली आहे.
याबाबत माजी सरपंच यशवंत बाईत म्हणाले, अंजनवेल ग्रामपंचायत व गुहागर पंचायत समितीकडे पत्रव्यवहार करून ठेकेदाराने अडकवून ठेवलेल्या स्कूलबस आपल्या ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी आम्ही केली होती; मात्र तीन महिने झाले तरी ग्रामपंचायतीने त्याबाबत कार्यवाही केलेली नाही.
माजी सरपंच यशवंत बाईत, माजी उपसरपंच आत्माराम मोरे, अनिल खडपेकर, विजय मिशाळ, उमेश किल्लेकर, नवनाथ कुरधुंडकर, सुदीप कडव, मंगेश बागकर, दत्ताराम पडयाळ, जयराज भुवड, स्वप्नील खडपे, ऋषीकेश गुरव आदी ९० ग्रामस्थ या उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत. १४ मार्चपासून दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत अंजनवेल ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थ व विद्यार्थी पालक उपोषण करत आहेत. स्कूलबस ताब्यात मिळेपर्यंत हे उपोषण सुरू रहाणार असल्याचे आत्माराम मोरे यांनी सांगितले आहे.
स्कूलबस परत देण्यास ठेकेदाराचा नकार
ठेकेदाराची थकित रक्कम एका स्कूलबसच्या किंमतीएवढीही नाही. असे असताना तीनही स्कूलबस अडकवून ठेवणे हे चुकीचे आहे. ठेकेदारही माझे पैसे मिळाले की स्कूलबस परत करतो, असे सांगून आज ३ महिने होत आले. यामध्ये ग्रामपंचायतही ठोस पावले उचलत नसून नाइलाजाने आम्हाला उपोषणाचा मार्ग धरावा लागला असल्याचे माजी सरपंच यशवंत बाईत यांनी सांगितले.