
भाजी विक्रेत्यांचे लवकरच पूनवर्सन
89894
कणकवली : येथील पत्रकार परिषदेत बोलताना नगरसेवक शिशिर परुळेकर. शेजारी नगराध्यक्ष समीर नलावडे आदी.
भाजी विक्रेत्यांचे लवकरच पूनर्वसन
शिशिर परुळेकर : पारकरांनी आधी आपली घरपट्टी भरावी
कणकवली, ता.१९ : शहरातील भाजी विक्रेत्यांचे लवकरच पुनवर्सन होणार आहे. त्यासाठी दोन जागांचीही निश्चिती झाली आहे. त्यामुळे कन्हैया पारकर यांनी विनाकारण आमदार नीतेश राणेंवर आरोप करू नयेत. तसेच दुसऱ्यांवर टीका करण्याआधी त्यांनी आपली थकीत घरपट्टी भरावी, अशी टीका नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी केली.
येथील नगराध्यक्ष दालनातील पत्रकार परिषदेत शिशिर परुळेकर बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक अभिजित मुसळे आदी उपस्थित होते. श्री.परुळेकर म्हणाले, ‘‘शहरातील भाजी विक्रेत्यांना आमदार तसेच नगरपंचायतीने वाऱ्यावर सोडलेले नाही. उड्डाणपुलाखाली या विक्रेत्यांसाठी तात्पुरती व्यवस्था केली होती. आता शहरातील दोन ठिकाणच्या जागा या विक्रेत्यांसाठी निश्चित केल्या आहेत. यात भाजी विक्रेते सहमतीने जी जागा निश्चित करतील तेथे त्यांचे पुनवर्सन करतील. तसेच नगरपंचायतीचे तेलीआळी डीपी रस्ता येथे भाजी मार्केट तयार झाले आहे. तेही ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.’’
--
शहराचा विकास वेगाने
परुळेकर म्हणाले, ‘‘शहराचा विकास वेगाने सुरू आहे. रिंगरोड, सर्व प्रभागात रस्ते, कृत्रिम धबधबा, क्रीडा सुविधा केंद्र अशी अनेक विकासकामे शहरात उभी राहिली आहेत. विरोधकांना टीका करण्यासाठी कोणतेही कारण शिल्लक नाही. त्यामुळे भाजी विक्रेत्यांच्या मुद्यावर विरोधी नगरसेवक नाहक टीका करत आहेत; मात्र त्यांच्या टीकेकडे आम्ही लक्ष देणार नाही. तर जास्तीत जास्त विकासकामे करण्याला प्राधान्य आहे. शहरातील गरीबातला गरीब व्यक्तीही घरपट्टी भरतो; मात्र नगरसेवक कन्हैया पारकर यांनी घराची अनेक वर्षांपासून घरपट्टी भरलेली नाही.’’