
तिलारीच्या पाण्यापायी ३० वर्षांपासून उपेक्षाच
89921
सुरेश गावडे
तिलारी कालव्याचे पाणी
रोणापालपर्यंत आलेच नाही
सुरेश गावडे; ३० वर्षांपासून उपेक्षा, उद्या मोर्चा
बांदा, ता. १८ ः शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात जमिनी खरेदी करून तिलारी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत बांदा शाखा कालव्याचे काम तीस वर्षांपासून सुरू असूनही अद्याप रोणापालपर्यंत पाणी काही आले नाही. अधिकाऱ्यांनी ४२ किलोमीटरपर्यंत पाणी सोडणार असल्याचे पत्र दिले होते; परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने जाब विचारण्यासाठी विलवडे, इन्सुली, रोणापाल, पाडलोस, मडुरा, सातोसे, कास, ओटवणेतील शेतकरी तसेच सहकाऱ्यांना घेऊन सोमवारी (ता. २०) सावंतवाडी तिलारी कार्यालयावर धडक मोर्चा काढू, असा इशारा रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी दिला.
गावडे म्हणाले की, अल्पदरात दिलेल्या जमिनी ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांचे पोट भरण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांनापाणी मिळावे म्हणून दिल्या. एक वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना घेराओ घातला होता; मात्र त्यावेळी पोकळ लेखी आश्वासने देत वेळ मारून नेण्याचे काम केले. तसेच पुन्हा एकदा आश्वासन दिले; परंतु आता शेतकरी कोणत्याही आश्वासनाला बळी न पडता जोपर्यंत रोणापालपर्यंत पाणी येत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही समस्त सहकारी शेतकऱ्यांतर्फे गावडे यांनी दिला. विसर पडलेल्या तिलारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना त्यांनी दिलेल्या पत्राची आठवण करून देत यापुढे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळल्यास प्रसंगी कार्यालयासमोर पाण्यासाठी आमरण उपोषण छेडणार असून याला सर्वस्वी जबाबदार तिलारी विभाग राहणार असल्याचेही माजी सरपंच गावडे यांनी सांगितले.