
सेवारस्ता नूतनीकरणास अखेर ‘मुहूर्त’
90149
मळगाव ः सेवारस्त्याच्या कामाची पाहणी करताना सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमान पेडणेकर.
सेवारस्ता नूतनीकरणास अखेर ‘मुहूर्त’
मळगावात कामास प्रारंभ; ग्रामस्थ, ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यास यश
सकाळ वृत्तेसवा
सावंतवाडी, ता. १९ ः मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासनजीक मळगाव येथे सेवारस्त्यालगत टाकण्यात आलेल्या गॅस पाईपलाईनमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. त्याचे पुन्हा नूतनीकरण करावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर नूतनीकरणाला कालपासून (ता. १८) सुरुवात झाली. मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली.
झाराप-पत्रादेवी बायपासच्या बाजूने गतवर्षी गॅस पाईपलाईन टाकण्यात आली होती. यासाठी महामार्गालगतचे सेवारस्ते खोदण्यात आले. काही ठिकाणी या गॅस पाईपलाईनसाठी चर खोदताना वापरलेला जेसीबी तसेच अन्य मशिनरीमुळे सेवारस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली होती. त्यानंतर पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्यांची चाळण झाली होती. गेले काही महिने कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या सेवारस्त्यावर वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत होती. त्यामुळे या रस्त्याचे त्वरित नूतनीकरण करावे, यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी तसेच स्थानिकांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. संबंधित ठेकेदाराने यासाठी लागणारी रक्कम देखील महामार्ग प्राधिकरणकडे जमा केली; मात्र याबाबतची मंजुरी नसल्याने काही महिन्यांपासून हे काम रखडले होते. कालपासून अखेर या कामाला सुरुवात झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.
---
लोकप्रतिनिधींचा कामावर हवा ‘वॉच’
याबाबत महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, रस्ता नूतनीकरणाचे काम मंजूर झाले असून लवकरच ते पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती दिली. गॅस पाईपलाईनसाठी मोठ्या प्रमाणात खोदाई केल्यामुळे व्यवस्थितरित्या सोलिंग करून त्यानंतरच डांबरीकरणाचे काम करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, रस्त्याला पुन्हा धोका निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या कामावर लक्ष देऊन ते योग्य रीतीने होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.