जिल्हा रुग्णालयाचे निवासी संकुल खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा रुग्णालयाचे निवासी संकुल खाक
जिल्हा रुग्णालयाचे निवासी संकुल खाक

जिल्हा रुग्णालयाचे निवासी संकुल खाक

sakal_logo
By

पान १
90153
90154


जिल्हा रुग्णालयाचे निवासी संकुल खाक
आगीमुळे नुकसान; गाद्या, पीपीई किटसह इमारतीची हानी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ः सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयाच्या निवासी संकुलाला आज दुपारी अडीचच्या सुमारास अचानक आग लागली. भरदुपारी लागलेल्या आगीने इमारतीच्या तळमजल्यापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत पेट घेतला. यामुळे रुग्णालय यंत्रणेची धांदल उडाली. मालवण पालिका व कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन बंब आणि सुरक्षा रक्षक, होमगार्ड, पोलिस यांच्या अथक प्रयत्नाने या आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने येथे कोणीही वास्तव्य करीत नसल्याने अनर्थ टळला; परंतु रुग्णांच्या गाद्या, कोरोना पीपीई किटसह पूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.
जिल्हा सामान्य रुग्णालयानजीक कर्मचारी निवासी संकुल आहे. रुग्णालयात अद्याप कर्मचारी वास्तव्य करीत नसले तरी या इमारतीत रुग्णालयाचे साहित्य ठेवले होते. आज दुपारी अडीचच्या सुमारास इमारतीला अचानक आग लागली. यामुळे यंत्रणेची धांदल उडाली. प्रथम कुडाळ नगरपंचायत आणि नंतर मालवण पालिकेचा बंब पाचारण केले. हे बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने रुद्रावतार धारण केला. त्यातच ही आग भर दुपारी लागल्याने भडका उडाला.
काही वेळाने कुडाळ नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल झाल्याने दिलासा मिळाला; मात्र या बंबामधील पाणी संपल्याने पुन्हा अडचण निर्माण झाली. सुदैवाने काही वेळात मालवण पालिकेचा बंब दाखल झाला. त्यानंतर पुन्हा आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. याचबरोबर पोलिस, सुरक्षा रक्षक आणि होमगार्ड यांनीही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दुपारी अडीच वाजता लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी सायंकाळचे पाच वाजले. आग लागलेल्या कर्मचारी निवासी संकुलात कर्मचारी वास्तव्य करीत नव्हते; अन्यथा अनर्थ घडला असता.


म्हणून लागली आग
निवासी संकुलाची अलीकडेच डागडुजी केली; परंतु परिसरात कचऱ्याचे साम्राज्य होते. परिणामी परिसरात लागलेल्या आगीने इमारतीत प्रवेश केला. इमारत परिसर स्वच्छ्ता ठेवली असती तर हा प्रकार घडला नसता, असे उपस्थितांतून बोलले जात होते.


आपत्कालीन यंत्रणा सुशेगाद
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्कालीन कक्ष कार्यरत आहे. याच आपत्कालीन कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास नियंत्रण मिळविण्यासाठी ‘आपदा मित्र’ तयार केले आहेत. यासाठी प्रशिक्षणावर लाखो रुपये खर्च कले; मात्र या आपत्कालीन कक्षापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शासकीय निवासी संकुलाला आग लागलेली आटोक्यात आणण्यासाठी कक्षाकडून कोणतीही मदत झालेली दिसली नाही. आपदा मित्र सुद्धा दिसले नसल्याने उपस्थित नागरिक, कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

प्राधिकरण झोपलेले
निवासी संकुलला लागलेली आग विझविताना कुडाळ अग्निशमन बंबाचे पाणी संपल्याने अडचण निर्माण झाली. सिंधुदुर्गनगरी विकासासाठी शासनाने प्राधिकरण स्थापन केले आहे. मात्र, आपल्या कार्यक्षेत्रातील एका शासकीय इमारतीला आग लागलेली असताना तेथे पाणी उपलब्ध करून देण्याची तसदी प्राधिकरणने घेतली नसल्याचे दिसून आले.