खेड-एकनाथ शिंदे सभा बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-एकनाथ शिंदे सभा बातमी
खेड-एकनाथ शिंदे सभा बातमी

खेड-एकनाथ शिंदे सभा बातमी

sakal_logo
By

९०१८८
९०१८९

मर्यादा सोडण्याची वेळ आणू नका
---
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडविला
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १९ ः उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला नसता, तर फार वाईट परिस्थिती झाली असती. त्यांच्याकडे केवळ गद्दार आणि खोके हे दोनच शब्द आहेत. सत्तेसाठी त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी लाचारी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी पक्ष गहाण ठेवला, तो धनुष्यबाण आम्ही सोडविला. आता शिवसेना नाव आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वादही आपल्यासोबत आहेत, असे विराट जनसमुदायाला सांगत, सहन करायला एक मर्यादा असते, ती सोडण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.
येथील गोळीबार मैदानावर आज झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम, ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, आमदार योगेश कदम, सिद्धेश कदम, नरेश म्हस्के, सदानंद चव्हाण, शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘कोकणातील बांधव-भगिनींनो माझी विनंती आहे, की कॅमेरे सगळीकडे फिरवा. या महाराष्ट्राला ही सभा किती विराट आहे, हे भगवे वादळ दाखवा. काही लोकं ही सभा पाहत असतील. पूर्वी झालेली सभा, त्या वेळची गर्दीची तुलना करायला आलेलो नाही. कोकण टिळकांची जन्मभूमी, सावरकरांची कर्मभूमी, परशुरामाची पावनभूमी, आंबेडकरांसारख्या रत्नांची भूमी आहे. काळकाईचा आशीर्वाद या भूमीला आहे. बाळासाहेबांची सभा या मैदानात झाली. गेल्या आठवड्यात याच मैदानात फुसका बार, आपटी बार येऊन गेला. त्यांना उत्तर द्यायला आलो नाही. टीकेला काय उत्तर द्यायचे? तोच-तोच थयथयाट याला काय उत्तर देणार? मुंबईतही गेले सहा महिने असाच थयथयाट, आदळआपट सुरू आहे. तोच काही बैठका झाल्या. महाराष्ट्रातील सगळीकडे सर्कशीचे खेळ सुरू होणार आहेत. प्रत्येक वेळी फक्त खोके आणि गद्दार हे दोनच शब्द आहेत. सत्तेसाठी ज्यांनी हिंदुत्व सोडले, त्यांच्याबद्दल सांगण्याची गरज नाही. येथे मुंगीला शिरायला जागा नाही. हा जनसागर कसा आला. कोकणी माणसाने बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम केले. हे प्रेम या सभेतून दाखवून दिले आहे. आम्हाला उत्तर देण्याची गरज नाही. या सभेनेच उत्तर दिले आहे. बाळासाहेबांमागे कोकणी माणूस आहे, शिवसेनेच्या आणि धनुष्यबाणाच्या पाठीशी आहे. आम्ही तीच भूमिका घेऊन पुढे आलो आहोत. कोकणातील आमदार शिलेदारांची किती संख्या पाहिली! एकनाथ शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून या लढ्यात सोबती होते, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. योगेशने सांगितले, काय-काय खेळ सुरू होता. हा निर्णय घेतला नसता तर परिस्थिती बदलली नसती. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला. कोकणी माणूस शब्द दिला की मागे फिरत नाही, ही ख्याती आहे. कोकणशी माझे नाते जिव्हाळ्याचे. माझी आई म्हाळंगची आहे. बाबा मला म्हणाले, आमचं घर जळालं तेव्हा भावकीने आधार दिला.’’
सत्ता येते-जाते; पण नाव गेलं की ते परत करता येत नाही. शिवसेना मोठी करायची आहे, बाळासाहेबांचे नाव मोठे करायचे आहे. म्हणून एकच सांगेन, शिवसेनेला जसा डाग पूर्वी लावायचा प्रयत्न केला, तो पुढे लागू द्यायचा नाही. यापूर्वी सांगितलंय, गद्दारी आम्ही नाही केली. ती २०१९ मध्ये झाली. हिंदुत्वाचे राजकारण केले ही चूक झाली, असे विधानसभेत उद्धव ठाकरे यांनी सांगितले. म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी सत्तेसाठी चुकीचे ठरविले. याकूब मेमनच्या कबरीचा उद्धार कसा करू शकता?, राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात. त्यावर मूग गिळून बसता. मणिशंकर अय्यरने भाष्य केले, तेव्हा बाळासाहेबांनी चपलेने झोडला होता. राहुल गांधी यांच्या विधानाविषयी तुम्ही काही बोलत नाही. हे कसले हिंदुत्व? आम्ही सावरकरांचा अपमान सहन करू शकत नाही, हे निर्णय घेण्याचे खरे कारण होते. तुम्ही खोके, गद्दार बोलून किती पाप झाकणार. बाळासाहेब वडील होते हे सगळ्यांना मान्य. पण, बाळासाहेब शिवसैनिकांचे दैवत होते. वडील-वडील करून त्यांना छोटे, संकुचित करू नका. सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, असेही शिंदे यांनी बजावले.
बाळासाहेब म्हणायचे, एक दिवस पंतप्रधान करा, या देशातले ३७० कलम हटवतो. राम मंदिर बांधण्याचे स्वप्न बाळासाहेबांचे होते. आज मंदिर उभे राहतेय. ३७० कलम हटविले. म्हणजे स्वप्ने कुणी पूर्ण केली? त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला. ५० लोकांनी देशभक्तांबरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय बरोबर की चूक, ते तुम्हीच सांगा. बाळासाहेबांनी सांगितले, की काँग्रेसने सत्यानाश केला. देशाला लुटले. त्यांना जवळ करू नका. काँग्रेसच्या राहुल गांधींना या देशाचे पंतप्रधान करायला गेलात, जी व्यक्ती त्या पक्षाचा अध्यक्ष होण्याची जबाबदारी घेऊ शकत नाही. ती देशाची पंतप्रधान कशी होऊ शकते? जो राज्य जिंकू शकत नाही, त्या राहुल गांधींसाठी आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू मते मागतो, यापेक्षा दुर्दैव काय असू शकते, अशी टीका त्यांनी केली.

योगेशच्या पाठीशी
योगेश कदम बाळासाहेबांचे काम करणारे नेतृत्व आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे इथे उपस्थित आहेत. त्यांना पाडण्याची हिंमत कुणामध्ये नाही. पुढील पावणेदोन वर्षांत योगेश एवढे काम करतील की समोरच्या सगळ्यांची डिपॉझिट जप्त होतील. तेव्हा रामदासभाई, तुम्ही योगेश यांची चिंता करू नका, असे सांगत मुख्यमंत्री म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे, असा विश्‍वास शिंदे यांनी दिला.

तुम्हीच फक्त राहाल
कार्यकर्ते मोठे होतात, तेव्हा पक्ष मोठा होतो. कार्यकर्ता मोठा होत गेला, यापूर्वीची अनेक उदाहरणे पाहा. राज ठाकरे काय म्हणत होते. जिथे शिवसेना कमजोर आहे, तो भाग द्या. राणे असतील, राज असतील, त्यांनी काय गुन्हा केला, आता ते भेटतात. विचारांचे आदानप्रदान होते. पूर्वी बंधने होती. रामदास कदम यांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून त्यांचा आवाज बंद केला. कार्यकर्ता मोठा तर पक्ष मोठा होतो. उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितले, की ज्यांना जायचे त्यांनी जावा. आता सगळे जातील, तुम्हीच फक्त राहाल. हम दो-हमारे दो. माझे कुटुंब- माझी जबाबदारी. या सगळ्यांनी भोगले आहे.


विकास महत्त्वाचा
मी वारंवार दिल्लीत जाईन. मला अहंकारापेक्षा महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे. आपल सरकार नवीन आहे. हे सरकार सायलेंट मोडवर नाही. अलर्ट मोडवर आहे. सगळे अलर्ट आहेत. म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून आठ महिन्यांत किती निर्णय घेतले. वाचायला वेळ नाही. एवढे निर्णय घेतले. जंत्री मोठी आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. आमचा अजेंडा वैयक्तिक नाही, अशी टीका त्यांनी केली.


मुंबई-गोवा महामार्गाची एक लाईन मेपर्यंत
कोकणाने बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे. आमचं सरकार बाळसाहेबांच्या विचारांचे आहे. आम्ही आरोपाला उत्तर द्यायला आलो नाही. कोकणाला भरभरून द्यायला आलोय. मंत्री असताना रामदासभाईंचा एकच घोशा होता. समुद्रात वाया जाणारे कोयनेच्या ६४ टीएमसी पाण्याचे काय? त्याची बैठक तातडीने करतोय. खेड पोयनारचा २४१ कोटींचा प्रकल्प मंजूर केला आहे. त्याला ११४८ हेक्टर जमीन लागणार आहे. सिंचन प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करू. राष्ट्रीय मुंबई-गोवा महामार्गाची एक लाईन मेपर्यंत, तर पूर्ण रस्ता डिसेंबरपर्यंत सुरू होईल. मुंबई- गोवा हायवे ग्रीन फिल्ड ॲक्सेस रस्ता करतोय. कोस्टल हायवेचे काम एमएसआरडीए करतेय. मंडणगडला एमआयडीसी करण्याचा निर्णय होईल. घरी बसून आदेश देणारा मुख्यमंत्री मी नाही, तळागाळात जाऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे, असे शिंदे यानी सांगितले.