
वाचन संस्कृतीमध्येच संस्कार
90412
फोंडाघाट ः करूळ येथील ग्रंथालयाला येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.
वाचन संस्कृतीमध्येच संस्कार
प्रा.जगदीश राणे; करूळ येथील मधु मंगेश कर्णिक ग्रंथालयाला भेट
फोंडाघाट ,ता.२१ ः मधुभाईंचे लेखन हे कोकणी भूमीला समर्पित आहे. त्यांच्या लेखनात करूळचा परिसर चित्रित होतो. त्याचबरोबर मुंबई आणि कोकण हे नाते घट्ट होते. येथील जाती व्यवस्था, संस्कृती, कला, माणसं, माणसांच्या वृत्ती प्रवृत्ती, निसर्ग, प्राणी यांचे यथार्थ चित्रण दिसते. भूमीशी असणारे नाते अधोरेखित होते, असे प्रतिपादन प्रा. जगदीश राणे यांनी केले.
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मधील मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी करूळ येथील मधु मंगेश कर्णिक ग्रंथालयाला भेट दिली. यावेळी प्रा. राणे बोलत होते. प्रारंभी तेथील ग्रंथपाल श्री. शेट्ये तसेच ग्रंथालय कमिटीच्या सदस्या सौ. गोसावी यांनी विभाग प्रमुख डॉ. सतीश कामत, प्रा. जगदीश राणे व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
आपल्या मनोगतात बोलताना सौ.गोसवी म्हणाल्या की, ‘‘रोडावत चाललेली वाचन संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. मुलं वाचनालयाकडे येण्याचा ओढा कमी झाला, किंबहुना तो झपाट्याने कमी होत आहे. पुन्हा मुलांना ग्रंथालयाकडे वळवणे आव्हानात्मक आहे. पालक व शिक्षकांनी हे आवाहन स्वीकारले पाहिजे.’’ दरम्यान, ग्रंथपालांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांची ओळख करून दिली. अनेक प्रकारची पुस्तके मुलांनी हाताळली. ग्रंथालय व्यवहाराची ओळखही करून दिली. या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
--
विद्यार्थ्यांनो, वाचन करा
डॉ. सतीश कामत म्हणाले की ‘‘विद्यार्थ्यांनी वाचलेच पाहिजे. ग्रंथालयातील पुस्तके कपाटात पडून राहतात, त्याच्यावरची धूळ वाचकांन अभावी तशीच राहते हे चित्र चांगले नाही. मधुभाईंनी करूळ सारख्या गावात वाचनालय सुरू केले हे संस्कारक्षम समाजासाठी पोषक आहे. त्यांच्या लेखनात हे संस्कार दिसतात. कोकणी प्रामुख्याने मालवणी सन्मान माणसाचे यथार्थ चित्रण दिसते. त्यामुळे मालवणी माणूस लोकप्रिय झाला ज्ञात झाला.’’