
बांद्यात नववर्षानिमित्त प्रभातफेरी
90658
बांदा ः योग प्रभातफेरीत सहभागी झालेले बांदा पतंजली योग समितीचे साधक.
बांद्यात नववर्षानिमित्त प्रभातफेरी
बांदा ः हिंदू नववर्षाचे म्हणजेच गुढीपाडव्याचे औचित्य साधून बांदा पतंजली योग समितीतर्फे शहरात योग प्रभातफेरी काढण्यात आली. सर्वसामान्य लोकांपर्यंत योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार याबाबत जागरूकता निर्माण होण्याच्या उद्देशाने या योग प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीमध्ये पतंजली योग समितीचे सर्व योग साधक आणि शहरातील इतर सर्व नागरिकांनी सहभाग घेतला. ही प्रभातफेरी येथील श्री देव बांदेश्वर मंदिर येथून सकाळी सातला निघाली. छत्रपती संभाजी महाराज चौक, गवळी तिठा, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी ग्रामपंचायत इमारत या मार्गे पुन्हा श्री बांदेश्वर मंदिर येथे येऊन या योग प्रभातफेरीची सांगता झाली. या प्रभात फेरीमध्ये ‘करे योग रहे निरोग’, या जयघोषाचा उल्लेख होता. योग ही आपली संस्कृती आहे आणि योगाभ्यास करणे व इतरांना करावयास लावणे, हे कार्य पतंजली योग समिती, बांदाने हाती घेतले आहे.
..............
बांद्यात डबल बॅडमिंटन स्पर्धा
बांदा ः रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ, बांदातर्फे २५ व २६ मार्चला खुल्या डबल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेत्यास ३ हजार व चषक, तर उपविजेत्यास २ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा डेगवे ग्रामपंचायत नजीकच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहे. बॅडमिंटनप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बांदा रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अवधूत चिंदरकर व मिताली सावंत यांच्याशी संपर्क साधावा.