काजूला हमीभाव देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काजूला हमीभाव देण्याची मागणी
काजूला हमीभाव देण्याची मागणी

काजूला हमीभाव देण्याची मागणी

sakal_logo
By

काजूला हमीभाव
देण्याची मागणी
सावंतवाडीः सध्या काजू दरात घसरण होत आहे. बाजारपेठेत काजूचा दर किलोला १२० च्या खाली आला आहे. तर गावठी काजू व्यापारी खरेदी करण्यास बघत नाहीत. त्यामुळे काजू बागायतदार वर्ग हैराण झाला आहे. शासनाने काजू बागायतदारांना दिलासा देण्यासाठी काजूला हमीभाव द्यावा तसेच केंद्राने काजूवरील कमी केलेले आयात शुल्क पूर्ववत करावे, अशी मागणी जिल्हा शेतकरी संघटनेने केली आहे. कोरोनापूर्वी हा दर प्रति किलो १५० वर होता; परंतु कोरोना काळात तो ९० रुपयांवर आला. त्यानंतरच्या काळात हा दर १३० रुपयेपर्यंत आहे. यंदाही हा दर १३० रुपयेपर्यंत
गेला होता; परंतु आता तो १२० रुपयापर्यंत आल्याने काजू बागायतदार वर्ग हैराण झाला आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर व बाबल आल्मेडा यांनी केली आहे.
...............
वेंगुर्लेत सोमवारी
धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्लेः मारुती बसथांबा येथील श्री देव हनुमान मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २७ व ३० मार्चला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री हनुमान मंदिर सेवा न्यासतर्फे वर्धापन दिन उत्सव २०२३ अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमांत २७ ला सकाळी ''श्रीं''ची पूजाअर्चा व लघुरुद्र, रात्री ८ वाजता भजन, ३० ला सकाळी १०.३० वाजता अवधूत नाईक यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सव, रात्री ८ वाजता भजन होणार आहे.
.................
नरेंद्र डोंगरावर
आग्नितांडव कायम
सावंतवाडीः येथील नरेंद्र डोंगरावर गुढीपाडव्या दिवशी लागलेली आग नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनंतर नियंत्रणात आणली. दुपारपासून सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. उष्म्यामुळे पेटलेला वणवा वाढतच आहे. मनुष्यवस्तीकडे आग येत असल्याचे लक्षात येतात नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधला. आग कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट झाले नाही. धुराचे लोट दुपारच्या सुमारास अधिकच दिसत होते. नागरिकांनी नरेंद्र डोंगरावर धाव घेतली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सुमारे पाच तास आगीवर नियत्रण मिळविण्याचे वन विभागाचे प्रयत्न सुरू होते. दरवर्षी एप्रिल-मेच्या दरम्यान जंगलांना आगी लावण्याचे प्रकार घडत असून त्यामुळे वनसंपत्तीचे नुकसान होत असल्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
..............
आशियेत उद्या
''चैत्रधून'' कार्यक्रम
कणकवलीः गंधर्व फाउंडेशन कणकवली व कणकवली नगरपंचायत यांच्यावतीने शनिवारी (ता. २५) सायंकाळी ६ ते ८ यावेळेत आशिये येथील श्री दत्तक्षेत्र मठात ''चैत्रधून'' हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. यात गोवा येथील सोनिक वेलिंगकर यांचे बासरीवादन, नंतर गोवा येथील नीतेश सावंत यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना संगीतसाथ प्रसाद सावंत व अनिल कोंडुरकर देणार आहेत. संगीत रसिकांनी याचा लाभ घ्यावा.