
संगमेश्वर ः लहान मुलं जपताहेत पालखीची परंपरा
फोटो ओळी
- rat२३p२.jpg- KOP२३L९०८१८ पालखीची परंपरा जपणारी लहान मुले.
लहान मुलं जपताहेत पालखीची परंपरा
मोठ्या मंडळींचं अनुकरण ः लहानपणीच ऐक्याची भावना
संगमेश्वर, ता. २३ ः ग्रामदेवता आणि कोकण यांचं अतूट नातं आहे. वर्षातून एकदा शिमगोत्सवात ग्रामदेवता गावातील प्रत्येक घरात पालखीत विराजमान होऊन आली की भक्ताला धन्य झाल्यासारखं वाटते. मोठ्या मंडळींची ही परंपरा पुढे पुढे आपोआप हस्तांतरित होते. शिमगोत्सवात मोठी मंडळी ग्रामदेवतेची सेवा कशी करतात यावर बारीक लक्ष ठेवून गावातील छोटी मुलं गुढीपाडव्याला छोटी पालखी घरोघर फिरवून मोठेपणी आम्ही ग्रामदेवतेच्या सेवेत कोठेही कमी पडणार नाही याची जणू हमीच देत असतात. कोकणच्या अनेक गावातून आज बालभक्तांची पालखी घराघरातून नेण्यात आली. ही परंपरा जपण्याचा छोट्या मुलांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
संगमेश्वर तालुक्यातील विविध गावातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर छोट्या मुलांची पालखी ग्रामदेवतेच्या जयजयकारात गावातून फिरवण्यात आली. जवळपास २५ ते ३० मुलं विशेष म्हणजे छोट्या मुलींसह सकाळी मंदिरात एकत्र आली. पालखीत प्रतिकात्मक मूर्ती ठेवून ग्रामदेवतेच्या जयजयकाराने प्रार्थना करून पालखी ढोलताशांच्या गजरात, भगव्या निशाणासह गावातील प्रत्येक घरात नेण्यात आली. पालखी घरात विराजमान झाल्यावर घरातील सर्व मंडळी मनोभावे पूजा करतात. त्यानंतर प्रत्येकाच्या अंगणात ही पालखी थोडावेळ नाचवून पुढच्या घरात विराजमान होते. पालखीला दिले जाणारे तांदूळ, गुळ-खोबऱ्याचा नैवेद्य यातून ही सर्व मुलं सर्वांच्या सोयीने एक दिवस ठरवून एकत्रित भोजन करतात. गेल्या चार वर्षांपासून १६ वर्षांपर्यंतची मुले या सोहळ्यात सहभागी होत आहेत. सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे यात मुलींचाही सहभाग आहे.
---------
चौकट
घराघरांतून कौतुक
गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मुले पालखीची सर्व तयारी करून ठेवतात. मोठ्यांप्रमाणे या पालखीलाही पासोडा बांधला जातो, फुलांच्या माळांनी पालखी सजवली जाते. ते छोटीशी पालखी तयार करतात. पालखी घेऊन येणाऱ्या छोट्यांचे घराघरातून मोठे कौतुक करून त्यांना खाऊ दिला जातो. बालभक्तांची परंपरा जपण्यातील तत्परता आणि सर्वांना सामावून घेत ग्रामदेवतेप्रती मनात असणारा भक्तीभाव या उपक्रमातून दिसून येतो.