गुहागर ः नारळ फोडल्यावर नेते वचन विसरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः नारळ फोडल्यावर नेते वचन विसरले
गुहागर ः नारळ फोडल्यावर नेते वचन विसरले

गुहागर ः नारळ फोडल्यावर नेते वचन विसरले

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat२३p६.jpg-KOP23L90822 गुहागर ः शीर भाटले आंबेकरवाडीतील प्रवासी निवारा शेड


नारळ फोडल्यावर नेते वचन विसरले
शीर भाटले आंबेकरवाडीची व्यथा ; रक्कम दिली नाहीच, वाडीलाही विसरले
गुहागर, ता. २३ ः वाडीचा पक्षप्रवेश झाला. प्रवासी निवाराशेडचे बांधकामही पूर्ण झाले; पण पैसे देण्याची वेळ आल्यावर नेते आपण नारळ का फोडला? तेच विसरले. व्यापारी आणि कामगार मात्र उधारी आणि मेहनतान्यांच्या पैशांसाठी ग्रामस्थांच्या मागे लागले. जो पक्ष सोडला ते आणि ज्या पक्षात गेले ते विचारत नसल्याचे शीर भाटले आंबेकरवाडीतील ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे.
शृंगारतळी आबलोली रस्त्यावर भाटले आंबेकरवाडी आहे. या वाडीला प्रवासी निवारा शेड बांधून हवी होती. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका पक्षाच्या तालुका आणि जिल्ह्याच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आंबेकरवाडीला पक्षप्रवेशाची गळ घातली. प्रवासी निवाराशेडचा संपूर्ण खर्च देतो, असे गाजर दाखवले. आंबेकरवाडीतील ग्रामस्थ आजपर्यंत ज्या पक्षाच्या पाठीशी कायम उभे होते त्यांनी असे काहीच दिले नव्हते. आपले काम होत असेल तर या पक्षात जायला काय हरकत आहे, असा सूर बहुतेक वाडीकऱ्यांनी लावला.
प्रवासी निवाराशेडच्या बदल्यात वाडीचा पक्षप्रवेश निश्चित झाला. वाडीतील बबन सोनू आंबेकर यांनी जमीनही दिली. या पक्षाच्या तालुका आणि जिल्ह्याचे मुख्य पदाधिकारी ठरलेल्या दिवशी कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह भाटले आंबेकरवाडीत आले. प्रवासी निवाराशेडच्या भूमिपूजनाचा नारळ फोडला. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. प्रवासी निवाराशेडच्या कामाला सुरवात झाली. नेते रोज फोनवरून चौकशी करत होते. अडचण सोडवत होते. मार्च २०२० मध्ये प्रवासी निवाराशेड बांधून पूर्ण झाली. निवाराशेडवर नवतरुण विकास मंडळ आणि महिला विकास मंडळ शीर भाटले आंबेकरवाडीचा फलक झळकला. जमीन देणारे बबन सोनू आंबेकर यांचे नाव काळ्या पाटीवर सुवर्णाक्षरात लिहिले गेले. उद्‌घाटन सोहळ्याला दोन्ही नेत्यांना बोलावण्यात आले; मात्र याच कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे गेल्या. त्यामुळे दोघांपैकी कोणीच आले नाही. त्यांना पक्षप्रवेश केलेल्या वाडीचाही विसर पडला. त्यामुळे आता उधारीचे पैसे द्यायचे कसे असा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे.

कोट
प्रवासी निवारा शेडसाठी लागणारे साहित्य आम्ही उधारीवर आणले होते. बांधकाम कामगारांची मजुरीही द्यायची होती. काम अर्ध्यावर आले आणि नेत्यांनी दुर्लक्ष केले. मी स्वत: जबाबदारी घेऊन काम पूर्ण केले. कामगार आणि व्यापारी रोज उधारी पूर्ण करण्यासाठी तगादा लावत होते. दोन्ही नेत्यांना फोन लावून आम्ही थकून गेलोय.
- वसंत आंबेकर, वाडी कार्यकर्ता