रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

आगाशे विद्यामंदिरात
आज आनंद बाजार
रत्नागिरी : विद्यार्थ्यांना खरेदी-विक्रीचा आनंद घेता यावा. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान कळावे याकरिता भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरच्या प्रांगणात आनंदबाजारचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत बाजार भरेल. यात इयत्ता तिसरी ते चौथीचे विद्यार्थी विक्रेते बनणार आहेत. खरेदी-विक्रीचा व्यवहार रोखीत होणार आहे. ऑनलाइन पेमेंट किंवा क्यू आर स्कॅनर येथे नाही. घरगुती वापराच्या वस्तू, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, शालोपयोगी वस्तू, छोटी खेळणी, लिंबू, कोकम सरबत, भेळ, ताज्या फळांच्या फोडी, चणे शेंगदाणेसुद्धा या बाजारात विक्री करण्यात येणार आहेत. या बाजारात येऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी केले आहे.
----------
दहिवलीतील टंचाईची समस्या मिटली
खेड ः तालुक्यातील दहिवली-रामवाडी येथील वर्षानुवर्षे सतावणारी पाणीटंचाईची समस्या बहिरवली येथील सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले यांच्या माध्यमातून मिटली आहे. या ठिकाणी विंधन विहिरीची सुविधा उपलब्ध करून दिल्याने पाणीप्रश्न संपुष्टात आला आहे. दहिवली-रामवाडीतील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. याबाबत ग्रामस्थांनी जल फाउंडेशन कोकण विभागाचे अध्यक्ष नितीन जाधव यांच्या माध्यमातून खालिद चौगुले यांच्याकडे पाणीसमस्येचा प्रश्न मांडला होता. ग्रामस्थांना वर्षानुवर्षे भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या गंभीरपणे घेत दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी सर्वप्रथम दहिवली -रामवाडी येथे जाऊन पाणी तपासणी करून घेतली. यानंतर ग्रामस्थांना विंधन विहिरीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत प्रत्यक्षात कार्यवाहीदेखील केली. विंधन विहिरीची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांना भेडसावणारा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. खालिद चौगुले यांच्या योगदानाबद्दल दहिवली-रामवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष एकनाथ कदम यांच्यासह ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.
------
करिअर संधींवर आज
रत्नागिरीत मार्गदर्शन
रत्नागिरी : बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व सर्व विद्यार्थी, पालकांसाठी शिरगावच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने शुक्रवारी (ता. २४) मोफत समुपदेशन कार्यक्रम आयोजित केला आहे. करिअर पाथ निर्मितीमध्ये विश्वविक्रम करणारे प्रा. विजय नवले यात मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत जि. प. जवळील मराठा भवन मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. प्रा. विजय नवले यांनी गेल्या २३ वर्षांत राज्यभरात ३५०० हून अधिक करिअर व्याख्याने दिली आहेत. अभ्यासपूर्ण मांडणी, ओघवती वक्तृत्वशैली, रंजक किस्से ते व्याख्यानादरम्यान सांगतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन फॉर वुमेन्सने केले आहे.