चिपळूण ः टेरव जलजीवन मिशन साठवण टाकीस स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  टेरव जलजीवन मिशन साठवण टाकीस स्थगिती
चिपळूण ः टेरव जलजीवन मिशन साठवण टाकीस स्थगिती

चिपळूण ः टेरव जलजीवन मिशन साठवण टाकीस स्थगिती

sakal_logo
By

फोटो ओळी
- ratchl२३१.jpg ः KOP२३L९०८६७ चिपळूण ः ग्रामस्थांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी साठवण टाकीच्या जागेची पाहणी केली.
-ratchl२३२.jpg ः KOP२३L९०८६८ ग्रामपंचायतीत ग्रामस्थांशी संवाद साधताना बीडीओ व पंचायत समितीचे अधिकारी.
-------------------
टेरव जलजीवन साठवण टाकीस स्थगिती
जागेबाबत ग्रामस्थांची तक्रार; जागा मोजणीचे गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः तालुक्यातील टेरव येथील जलजीवन मिशन योजनेंतर्गत स्मशानभूमीलगत उभारण्यात येणाऱ्या पाणीयोजनेच्या साठवण टाकीस ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता. त्यानुसार गुरुवारी (ता. २३) गटविकास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. स्मशानभूमी असलेली २० गुंठेची शासकीय जागेची मोजणी करून हद्द निश्चित करावी. त्यानंतर साठवण टाकीचे काम सुरू करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांनी टेरव ग्रामपंचायतीत ग्रामस्थांना सांगितले.
टेरव ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात १४ मार्चला उपोषण केले होते. त्या वेळी ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांची चौकशी करण्याची मागणी केली होती. शिवाय जलजीवन मिशन योजनेतून स्मशानभूमीलगत बांधण्यात येणाऱ्या साठवण टाकीच्या कामास आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी भास्कर कांबळे, विस्तार अधिकारी मिलिंद केळस्कर, पाणीपुरवठा शाखा अभियंता गवस, कृषी अधिकारी भिमराव पाटील आदींनी साठवण टाकीच्या जागेची पाहणी केली. या वेळी साठवण टाकीच्या लगतच्या जागामालकांनीही आक्षेप घेतला नाही. त्यानंतर अधिकारी व ग्रामस्थांचा ताफा ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचला. तेथे ग्रामस्थांच्या आक्षेपावर चर्चा झाली. तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ माळी, कृष्णा कुंभार, सोमा म्हालीम, रामचंद्र शिरकर, राजेंद्र म्हालीम, अनंत कराडकर, विजय तांदळे, परशुराम फागे, प्रशांत साळवी आदींनी पाणीयोजनेविषयी मते मांडली. पाणीयोजनेसाठी अडरे येथून पाणी उचलावे लागते. दूरवरून पाणी येत असल्याने विद्युतबिल जास्त येते. शिवाय अंतर लांब असल्याने जलवाहिनी फुटण्याचे प्रकार जास्त असतात. परिणामी, पाणीपट्टी वाढल्याने योजना अडचणीत येते. साठवण टाकीच्यालगतच स्मशानभूमी आहे. त्या परिसरात प्रदूषण झाल्यानंतर ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळणार नाही. स्मशानभूमीची जागा सोडून इतरत्र साठवण टाकी बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर गटविकास अधिकारी म्हणाल्या, जलजीवन मिशनच्या योजना तत्काळ मार्गी लावण्याचे केंद्र व राज्य सरकारचे निर्देश आहेत. स्मशानभूमीची जागा शासकीय असल्याने तेथे साठवण टाकी प्रस्तावित केली. जागेच्या हद्दीबाबत आता तक्रारी आल्याने प्रथम जागेची मोजणी करून हद्द निश्चित केली जाईल. तोपर्यंत साठवण टाकीचे काम थांबवण्यात येईल. ग्रामस्थांनी केलेल्या इतर विकासकामांच्या तक्रारीची पुढील महिन्यात सविस्तर तपासणी करण्यात येईल, असे सांगितले. या वेळी सरपंच स्वप्नाली कराडकर, ग्रामविकास अधिकारी माने यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

कोट
स्मशानभूमीलगत साठवण टाकी उभारण्यापूर्वी लगतच्या जमीन हिस्सेदारांना तिथे बोलावले होते. त्यांचा हद्दीवरून विरोध नाही. ही २० गुंठेची जागा शासकीय मालकीची असल्याने तेथे साठवण टाकी उभारण्याचा निर्णय सर्वानुमते झाला होता. ग्रामसभेतदेखील त्यावर चर्चा झाली होती.
- स्वप्नाली कराडकर, सरपंच, टेरव