
देवगडच्या विकासकामांसाठी 9 कोटींचा निधी
देवगड विकासकामांसाठी ९ कोटींचा निधी
शरद ठुकरुल ः पालकमंत्री चव्हाण, आमदार राणेंच्या प्रयत्नातून कामे
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ ः येथील देवगड जामसंडे शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे ४ कोटी ६८ लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. यापूर्वी जिल्हा वार्षिक नगरोत्थान योजनेंतर्गत सुमारे ४ कोटी ३५ लाखाचा निधी मंजूर असल्याने आता एकूण सुमारे ९ कोटीचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती भाजपचे नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल यांनी पत्रकारांना दिली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला असल्याचा दावाही श्री. ठुकरूल यांनी केला.
येथील शहरातील विविध विकासकामांची यादी श्री. ठुकरूल यांनी प्रसिध्दीस दिली. त्यानुसार, जामसंडे भटवाडी पिंपळपार ते स्मशानभूमी रस्ता, देवगड जामसंडे तरवाडी-पिरवाडी रस्ता, देवगड जामसंडे कावलेवाडीमधील रस्ता, जामसंडे तलाठी कार्यालयापर्यंतचा रस्ता, जामसंडे भाजी दुकान ते आतील जाणारा रस्ता, जामसंडे मुख्य रस्ता ते धोपटेवाडीपर्यंत जाणार्या रस्त्याशेजारी बंदिस्त गटार, जामसंडे कावलेवाडी मिळणारा रस्ता (पेट्रोलपंप ते वेळवाडी सडा वडाचे झाड ओपन जीमपर्यंत), जामसंडे वेळवाडी सडा ते टिळकनगर रस्ता, जामसंडे बेलवाडीतील पायवाट काँक्रिटीकरण, जामसंडे खाकशी सार्वजनिक विहीर ते स्मशानभूमीपर्यंत चिरेबंदी पायवाट बांधणे व स्मशानभूमीला आवारभिंत, देवगड शहरातील रस्ता काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार, जामसंडे खाकशी ब्राम्हणदेवपर्यंत अपूर्ण राहिलेली पायवाट, जामसंडे पाटकरवाडी वडापासून आतील पायवाटेचे काँक्रिटीकरण व मजबुतीकरण, धोपटेवाडीपर्यंत जाणारा रस्ता, जामसंडे खालची बेलवाडी लघुनळ योजना विस्तार अशा एकूण १५ कामांसाठी २ कोटी ७५ लाख, तसेच नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेअंतर्गत निधी २०२२-२३ यामध्ये पांदण ते विठ्ठल मंदिर तारामुंबरी रस्ता, जामसंडे तरवाडीमधील नवीन रस्ता व संरक्षक भिंत, पाण्याची पाईपलाइन बदलणे, प्रभाग दोनमधील ओहोळावर नवीन कॉजवे, पाटकरवाडीमधील वडापर्यंत पायवाट दुरुस्ती, प्रभाग १५ मधील जामसंडे लक्ष्मीनारायण नगरीमधील खुले क्षेत्र विकसित करणे व तेथे नाना-नानी पार्क, जामसंडे वेळवाडीमध्ये खाडी किनारीपर्यंत बंदिस्त गटार, सोहनीवाडीकडे जाणारा रस्तामधील उर्वरित रस्ता खडीकरण, जामसंडे कानखोलवाडी येथे पिण्याच्या पाण्याची नवीन जलवाहिनी, प्रभाग ५ मध्ये विंधन विहिरीवर लघुनळ योजना, जामसंडे कावलेवाडीमधील जाणारा रस्ता, देवगड कदमवाडी येथे संरक्षक भिंत अशा एकूण ११ कामांसाठी सुमारे १ कोटी ९३ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असल्याची माहिती देण्यात आली.