
रामनवमी उत्सव कणकवलीत सुरू
रामनवमी उत्सव कणकवलीत सुरू
कणकवली ः शहरातील देव काशीविश्वेश्ववर मंदिरात बुधवारपासून (ता. २२) रामनवमी उत्सवास प्रारंभ झाला. यानिमित्त ३१ मार्चपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २४ ते ३१ मार्च या कालावधीत रोज सायंकाळी सहाला हरकुळ खुर्द येथील गजानन राणे यांचे हरिकीर्तन, सातला आरती, रात्री साडेआठला श्रींची पालखी मिरवणूक, ३० मार्चला सकाळी आठला श्रींची पूजा, अभिषेक, साडेदहाला श्रीराम जन्माचे कीर्तन, दुपारी बाराला श्रीराम जन्म सोहळा, त्यानंतर पालखी मिरवणूक, दुपारी दोन ते चार दरम्यान भजने, सायंकाळी चारला सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक, रात्री साडेआठला पालखी मिरवणूक, साडेनऊला कीर्तन, ३१ मार्चला रात्री साडेनऊला पालखी मिरवणूक, नंतर कीर्तन होईल. सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष अॅड. प्रवीण पारकर यांनी केले आहे.
----------------
बालवैज्ञानिक परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
कणकवली ः युरेका सायन्स क्लबतर्फे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन रविवारी (ता. २६) सकाळी साडेदहाला येथील विद्यामंदिर हायस्कूल येथे केले आहे. कार्यशाळेत वैज्ञानिक क्षेत्रात गेली २० वर्षे कार्यरत असलेले तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत या परीक्षेचा अभ्यास करण्याची पद्धत, परीक्षेचे टप्पे व त्यांची कारणे, वापरली जाणारी पुस्तके, ४१ वर्षांमध्ये यशस्वी झालेल्या त्या बालवैज्ञानिकांचे सध्याचे कार्य या परीक्षेमध्ये पालकांची भूमिका परीक्षेंतर्गत प्रकल्प सादर करणे व आतापर्यंत जिल्ह्यातील बालवैज्ञानिकांनी सादर केलेले प्रकल्प यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन सुषमा केणी यांनी केले.