चिपळूण ः चिपळुणातील प्रांत ऑफिस ते पागनाका दरम्यान अंडरपास करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  चिपळुणातील प्रांत ऑफिस ते पागनाका दरम्यान अंडरपास करावा
चिपळूण ः चिपळुणातील प्रांत ऑफिस ते पागनाका दरम्यान अंडरपास करावा

चिपळूण ः चिपळुणातील प्रांत ऑफिस ते पागनाका दरम्यान अंडरपास करावा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२४p२२.jpg ःKOP२३L९१०९० चिपळूण ः राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना नागरिक.
-rat२४p२६.jpg ः KOP२३L९११३८ चिपळूण शहरातील चौपदरीकरणाच्या कामात अंडरपास न ठेवल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
----------
चिपळुणातील चौपदरीकरण--लोगो

महामार्गाच्या कामात नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

एकही अंडरपास नसल्याने गैरसोय ; राष्ट्रीय महामार्गला निवेदन

चिपळूण, ता. २५ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत चिपळूण शहरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असताना दुसरीकडे मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग किंवा चौपदरीकरण करणाऱ्या कंपनीने कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. प्रांताधिकारी कार्यालयापासून पागनाक्यापर्यंत एकाही ठिकाणी अंडरपास न ठेवल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून मोठा अपघात होण्याचा धोका आहे. याला संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनी जबाबदार राहील. याबाबत जगदीश गोरिवले यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजीनगरपर्यंत उड्डाणपुलाच्या पिलरचे काम सुरू आहे. हा उड्डाणपूल युनायटेड हायस्कूलच्या इथे उतरणार आहे. मात्र, त्यानंतरच्या पुढील भागातील नागरिकांचा राष्ट्रीय महामार्ग विभागाने विचारच केलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे.
शहरातील प्रांताधिकारी कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यालय, बौद्धवाडी, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पागझरी हायस्कूल, कास्करआळी, गोरिवलेआळी, पाग मराठी शाळा, उघडा मारूती मंदिर परिसर, गोपाळकृष्णवाडी, जोशीआळी, रानडेआळी, मिरगलआळी, पॉवर हाऊस, गुहागर बायपास , पागनाका, पागमळा या वर्दळीच्या ठिकाणांचा राष्ट्रीय महामार्ग विभागाने चौपदरीकरण करताना अजिबात विचार केलेला नाही. या भागातील नागरिक चौपदरीकरण ओलांडून दुसऱ्या सर्व्हिस रोडकडे जाणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जायचे असेल तर सर्व्हिस रोडने उड्डाणपुलापर्यंत जायचे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
आत्ताच तयार केलेल्या सर्व्हिस रोडने विरुद्ध दिशेने गाड्या धावत आहेत. रस्ता पूर्ण झाला तरी त्या विरुद्ध दिशेनेच चालणार का? त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना डोळ्यासमोर ठेवल्या आहेत, याबाबत गोरिवले यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. चौपदरीकरणावरून धावणाऱ्या एसटी गाड्या अचानक पॉवर हाऊस येथून एसटी स्टॅण्डकडे वळणार कशा किंवा एसटी स्टॅण्डकडून आलेल्या गाड्या चौपदरीकरणावर येणार कशा, हा प्रश्न आहे. पॉवरहाऊस येथे मंजूर असलेला अंडरपास रद्द कुणी केला, असे सवाल उपस्थित होत आहेत. निवेदन देताना जगदीश गोरिवले, विजय गिजरे, गणेश खेडेकर, नयनेश तांबडे आदी उपस्थित होते.

चौकट
रस्ता ओलांडण्यासाठी व्यवस्थेचे वावडे
हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे २४ तास जलदगतीने वाहतूक होणार आहे. पूर्व, पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. शासकीय कार्यालय, पोलिस ठाणे, महसूल कार्यालय, शाळा दुतर्फा असल्याने रस्ता ओलांडण्यासाठी व्यवस्था काय? याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी, जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घ्यावी.

कोट
पॉवरहाऊस येथे अंडरपास मंजूर होता. त्यासाठी तेथील मोरीवर स्लॅब टाकताना शिगा उंच टाकण्यात आल्या होत्या; मात्र, अचानक त्या कापण्यात आल्या आणि आता जमिनीलगतच हा पूल केला जात आहे. मात्र, चिपळूणच्या भविष्याच्यादृष्टीने व नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून पॉवरहाऊस या ठिकाणी अंडरपास होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात प्रांत कार्यालय ते पागनाका दरम्यान भीषण अपघात होण्याचा धोका आहे, याची संबंधितांनी दखल घ्यावी.
- जगदीश गोरिवले, चिपळूण