
रत्नागिरी जिल्ह्यात शोधमोहिमेत आढळले 30 क्षयरुग्ण
जिल्ह्यात शोधमोहिमेत आढळले ३० क्षयरुग्ण
क्षयरोग केंद्राची माहिती; सर्वांवर आरोग्य केंद्रात उपचार सुरू
रत्नागिरी, ता. २५ः जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहिमेअंतर्गत ३० क्षयरुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर तत्काळ तालुक्याच्या त्या त्या ठिकाणी आरोग्यकेंद्रात उपचार सुरू केले आहेत. सर्वात जास्त राजापूर, लांजा आणि गुहागर तालुक्यात रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरी यांच्यावतीने दिली.
राज्यशासनाच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात ८ ते २१ मार्च २०२३ या काळात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोधमोहीम राबवण्यात आली. मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अतिजोखमीच्या भागात प्रत्यक्ष गृहभेटी देऊन संशयित क्षयरुग्णांची तपासणी करण्यात आली. निदान झालेल्या क्षयरुग्णांना प्रत्यक्ष उपचाराखाली ठेवण्यात आले. प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोधमोहीम जिल्ह्यात राबवताना संभाव्य असलेल्या एकूण १ लाख ४८ हजार ५ जणांना निश्चित करण्यात आले होते. हे सर्व अतिजोखमीच्या भागातील आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात शोधमोहीम हाती घेण्यात आली. संभाव्य लोकांच्या घरी जाऊन गृहभेटी देऊन लक्षणे असलेल्यांचे स्वॅब घेण्यात आले. यात ३० जणांचे स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नव्याने ३० रुग्ण निष्पन्न झाले. त्यामुळे आता ही मोहीम पुढील काळात देखील सुरू ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वच तालुक्यात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील क्षयरोगाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान आरोग्ययंत्रणेवर कायम आहे.
दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात नव्याने ३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर देखील उपचार सुरू करण्यात आले आहेत. यात १ रुग्ण चांदेराई, १ पावस आणि एक मालगुंडमधील रुग्णाचा समावेश आहे. कोरोनाच्या प्रादुभार्वाने आधीच प्रतिकारशक्ती कमी झालेली असताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. राजापूर तालुक्यात सर्वांत जास्त ६ क्षयरुग्ण आहेत. लांजात ५ तर गुहागरमध्ये ४ रुग्ण आहेत.
चौकट
फोटो - 91350
क्षयरुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी
रत्नागिरी - ३
राजापूर - ६
चिपळूण- २
दापोली- ३
गुहागर- ४
खेड- ३
मंडणगड- १
संगमेश्वर- ३
लांजा - ५