
अर्धवेळ नोकरीच्या आमिषाने 13 लाखाची फसवणूक
नोकरीच्या आमिषाने १३ लाखाची फसवणूक
चिपळूण ः पार्टटाईम जॉब करून हजारो रुपये कमवा असे आमिष दाखवत तब्बल १३ लाखांहून अधिकची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ ते १० मार्चदरम्यान ही फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गॅरी वॉशिंग्टन व अंकूर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निखिल शिंदे यांना पार्टटाईम जॉबचे आमिष दाखवण्यात आले. पार्टटाईम जॉब करून हजारो रुपये कमवता येतील, या मोहात ते अडकले. समोरची व्यक्ती जसे सांगत होती तशी त्यांनी कृती केली. नंतर मात्र दोघा संशयितांनी नोकरीसाठी पैशाची मागणी सुरू केली. नोकरी मिळेल या आशेने शिंदे यांनी देखील वेळोवेळी त्यांची मागणी मान्य केली. ५ ते १० मार्च २०२३ पर्यंत शिंदे यांनी ऑनलाइन तसेच संशयितांच्या बँक खात्यावर तब्बल १३ लाख १५ हजार ५३४ इतकी रक्कम ट्रान्सफर केली; मात्र पार्टटाईम जॉबचा थांगपत्ता नव्हता तसेच पैसेदेखील परत दिले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी गॅरी वॉशिंग्टन व अंकूर अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.