
गडमठ येथे घरात घुसून मारहाण
पोलिसांना माहिती देत
असल्याच्या रागातून मारहाण
वैभववाडी,ता.२५ ः दारू विक्रीचा चोरटा धंदा करीत असल्याची माहिती पोलिसांना देत असल्याच्या रागातून गडमठ येथे घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत विजय अनंत आडके (६२) यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विजय आडके हे शुक्रवारी (ता.२४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या घरात असताना शेजारी राहणारे राजेंद्र रमेश आडके, नागेश रमेश आडके व अशोक नारायण आडके यांनी त्यांच्या घरात घुसून ‘आम्ही दारुचा धंदा करतो; अशी बातमी पोलिसांना देतोस?’ असे बोलून लाकडाने मारहाण केली. या मारहाणीत विजय जखमी झाले. सोडविण्यासाठी त्यांची पत्नी विद्या, आई सुधा व सीताराम घाडी गेले असता त्यांनाही तिघांनी मारण्याची धमकी दिली, असे विजय खडके यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीनुसार राजेंद्र आडके, नागेश आडके व अशोक आडके यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३२४, ४५२, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून हवालदार शैलेश कांबळे अधिक तपास करीत आहेत.