
Parshuram Ghat : पुन्हा आठवडाभर बंद?, २ ते ३ दिवसांत अंतिम निर्णय
चिपळूण : महामार्गावरील परशुराम घाट आठवडाभरासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पोलिस प्रशासन, उपप्रादेशिक विभाग आणि चिपळूण महसूल विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे. यावर संबंधितांचा अहवाल मिळाल्यानंतर परशुराम घाट बंद ठेवण्याबाबतचा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे.
परशुराम घाटातील काम सुरू करण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून शुक्रवारी (ता. २४) जिल्हा प्रशासनाला अहवाल प्राप्त झाला होता. येत्या पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून या घाटात युद्धपातळीवर काम सुरू आहे. परशुराम घाटात अवघड ठिकाणी काम करावे लागणार असल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी या राष्ट्रीय महामार्ग ॲथॉरिटीकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसराची पाहणी करून जिल्हा प्रशासनाकडून येत्या २ ते ३ दिवसांत याबाबतीत अंतिम निर्णय होणार आहे. हा घाट नेमका कोणत्या दिवशी व किती वेळ कसा बंद करायचा याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून, येत्या २-३ दिवसांत याबाबत जिल्हा प्रशासनाकडून लवकरच हा निर्णय घेतला जाणार आहे.
परशुराम घाटात १.२० किमी लांबीत उंच डोंगररांगा, खोल दऱ्या असल्या कारणाने चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी हा भाग अवघड स्वरूपाचा आहे. उर्वरित १०० मीटर लांबीतील काम हे अवघड स्वरूपाचे आहे. या मार्गात सुमारे २५ मीटर उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम असल्याने या भागामध्ये चार टप्प्यांमध्ये खोदकाम करण्यात येत असून, त्यापैकी तीन टप्प्यांतील खोदकाम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेली माती खाली महामार्गावर येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कशेडी परशुराम हायवे प्रा. लि. यांनी या ठिकाणाच्या कामासाठी परशुराम घाट वाहतुकीसाठी २७ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत ठेवण्याची विनंती केली आहे. बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस चिपळूण या पर्यायी मार्गे वळवता येईल. तसे आदेश देण्याची विनंती पेण-रायगड विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग पावसाळ्यापूर्वी सज्ज
गेल्या वर्षीच्या पावसात हा घाट धोकादायक बनला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यावर्षीही या पावसाळ्यात हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागू नये, यासाठी परशुराम घाटात काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असल्याने किमान ७ दिवस घाट बंद राहणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग पावसाळ्यापूर्वी सज्ज करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वी दिली होती. चिरणी आंबडस या पर्यायी मार्गाला प्रमुख जिल्हामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. या मार्गाच्या अपग्रेडेशनचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.