
रेडी तीर्थक्षेत्री भाविकांची मांदियाळी
91770
रेडी ः कलशारोहण सोहळ्यासाठी द्विभुज गणपती मंदिरात केलेली आरास.
रेडी तीर्थक्षेत्री भाविकांची मांदियाळी
कलशारोहण सोहळ्यास प्रारंभ; धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ ः दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान रेडी (ता. वेंगुर्ले) येथील द्विभुज गणपती मंदिराच्या संप्रोक्षण कलशारोहण सोहळ्यास कालपासून (ता. २६) सुरुवात झाली. तत्पूर्वी कोल्हापूर येथून वाजतगाजत हा कळस रेडी येथे आणण्यात आला. यानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री गणेश दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटक व इतर भागातून असंख्य भाविक रेडी परिसरात दाखल झाले आहेत.
रेडी गणपती कलशारोहण सोहळ्यानिमित्त २६ ते २८ मार्चपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळी रेडी श्री गणपती मंदिर कलशाची कोल्हापूर येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. सर्वप्रथम कोल्हापूर येथील गणपतीचे भक्त श्री. देसाई यांच्या घरी कलशाची पूजा करण्यात आली. यानंतर निपाणी, गडहिंग्लज, वेंगुर्ले सातेरी मंदिर, उभादांडा चमणकर कुटुंबीय, आरवली, शिरोडा या ठिकाणी या कलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रेडी श्री देव सत्यपुरुष मंदिर ते श्री देव गजानन देवस्थान रेडी अशी भव्य ढोलपथक मिरवणूक काढण्यात आली. काल (ता. २६) मंदिरात शांतीपाठ, यजमान शरीरशुद्धी, गणपती पूजन पुण्याहवाचन, मातृकापूजन व संप्रोक्षण विधी आरंभ करण्यात आला. दुपारी नैवेद्य, आरती व सायंकाळी स्थानिकांची भजने व दशावतारी नाटक झाले. गजानन देवस्थानचे विनायक कांबळी व कुटुंबीय यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले.
--
मुख्य कलाशारोहण आज
आज शांतीपाठ, प्रकारशुद्धी, संप्रोक्षण विधी, कलश संप्रोक्षण, वास्तूयजन, ग्रहयजन, मुख्यहोम, नैवेद्य, आरती, सायंकाळी स्थानिक भजने व मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले. तर उद्या (ता. २८) मुख्य कलशारोहण कार्यक्रमासह विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन रेडी गजानन देवस्थान कमिटी, ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.