
जि.प.चे २४ कोटींचे अंदाजपत्रक
91815
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक सादर करण्यास आलेले प्रशासक प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, प्रकल्प संचालक उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर.
जि.प.चे २४ कोटींचे अंदाजपत्रक
१२ कोटींची वाढ; तब्बल ३० वर्षानंतर प्रशासनाकडून प्रक्रिया
ओरोस, ता. २७ ः जिल्हा परिषदेचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे अंतिम सुधारित २४ कोटी रुपयांचे आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे १७ कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक आज प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सादर केले. २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे मूळ अंदाजपत्रक १२ कोटींचे होते; मात्र त्यात १२ कोटींची दुप्पट वाढ झाली आहे. सादर केलेल्या मूळ अंदाजपत्रकात भजनी मंडळांसाठी साहित्य पुरविण्याची, जिल्ह्यातील मधुमेह रुग्णांसाठी मधू संजीवनी योजना तर वणवेग्रस्तांच्या नुकसानी रक्कमेत भरीव वाढ केली आहे. १९९२ नंतर ३० वर्षांनी जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक प्रशासनाने सादर केले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात यासाठी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांच्या अध्यक्षतेखाली खास बैठक झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक उदय पाटील, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, प्रभारी अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास आरोंदेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, महिला बाल कल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता महाजनी, शिक्षणाधिकारी महेश धोत्रे आदी उपस्थित होते.
सुधारित अंदाजपत्रक असे ः अध्यक्ष २ लाख ३८ हजार ८०० रुपये, सामान्य प्रशासन एक कोटी ५१ लाख ९९ हजार रुपये, शिक्षण २ कोटी १७ लाख ३७ हजार ७०० रुपये, बांधकाम ८ कोटी २३ लाख ५५ हजार ७५० रुपये, लघु पाटबंधारे ३६ लाख ४१ हजार १०० रुपये, आयुर्वेद ५ लाख रुपये, सार्वजनिक आरोग्य १ कोटी १५ लाख ९० हजार ३०० रुपये, ग्रामीण पाणी पुरवठा ४३ लाख ४७ हजार ७०० रुपये, शेती एक कोटी ४ लाख ८२ हजार ७०० रुपये, पशू संवर्धन एक कोटी २७ लाखव९८ हजार ४०० रुपये, समाज कल्याण एक कोटी ३६ लाख ८२ हजार २०० रुपये, जंगल दोन लाख ८० हजार २०० रुपये, महिला व बाल कल्याण ७६ लाख ३१ हजार ३६० रुपये, संकीर्ण, सामान्य प्रशासन, ग्राम पंचायत आणि वित्त विभाग मिळून दोन कोटी ४३ लाख ५० हजार १९० रुपये अशा एकूण २० कोटी ८८ लाख ८६ हजार ३०० रुपये खर्चाचे नियोजन केले आहे. तर तीन कोटी ११ लाख १३ हजार ७०० रुपये शिल्लक राहणार आहेत.
२०२३-२४ साठी १७ कोटींचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यात अध्यक्ष एक कोटी २२ लाख ६८ हजार ४०० रुपयांची तरतूद केली आहे. सामान्य प्रशासन ८१ लाख १६ हजार ३०० रुपये, शिक्षण एक कोटी ७० लाख ९६ हजार ६०० रुपये, बांधकाम पाच कोटी ५६ लाख ८२ हजार १०० रुपये, लघु पाटबंधारे ३३ लाख २ हजार रुपये, आयुर्वेद सहा लाख रुपये, सार्वजनिक आरोग्य एक कोटी एक लाख ४३ हजार ८०० रुपये, ग्रामीण पाणी पुरवठा ३१ लाख ५० हजार रुपये, शेती ९७ लाख १६ हजार ८०० रुपये, पशुसंवर्धन एक कोटी ९ लाख ५० हजार ३०० रुपये, जंगल एक लाख २०० रुपये, समाज कल्याण एक कोटी ३० लाख ५७ हजार १०० रुपये, महिला व बाल कल्याण ६० लाख २० हजार ५०० रुपये तर संकीर्ण, सामान्य प्रशासन, ग्राम पंचायत आणि वित्त विभाग मिळून एक कोटी ९६ लाख ४६ हजार ३०० रुपयांची तरतूद आहे. एकूण १६ कोटी ९९ लाख ४०० रुपयांचे नियोजन केले असून ९९ हजार ६०० रुपये शिल्लक दाखविले आहेत.
------------
चौकट
ब्रिफकेस घेऊन सभागृहात दाखल
आपण केंद्र आणि राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री ब्रिफकेस घेऊन सभागृहात दाखल होताना पाहिले आहे; पण आज प्रशासक प्रजित नायर आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे हे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी येताना ब्रिफकेस घेऊन दाखल होताना प्रथमच पहायला मिळाले. यावेळी नायर म्हणाले, ‘‘अर्थसंकल्प लोकप्रतिनिधी यांनीच सादर केला पाहिजे, असे माझे मत आहे; परंतु प्रशासक असल्याने तो सादर करीत आहे.’’
-----------
कोट
गतवर्षी १८ मार्च २०२२ ला शेवटची अंदाजपत्रकीय जिल्हा परिषद सभा झाली. त्यानंतर प्रशासक म्हणून काम पाहत असताना पहिल्या चार महिन्यांत निवडणूक होईल, सहा महिन्यांत होईल, असे वाटत असल्याने व्यवस्थित नियोजन करता आले नव्हते; मात्र २०२३-२४ साठी आतापासून खर्चाचे नियोजन सुरू केले आहे. यंदाचे अंदाजपत्रक तयार करताना अधिकाऱ्यांनी इच्छेनुसार तयार केला आहे. जिल्ह्याची गरज ओळखून त्यांनी नवीन योजना मांडत त्यासाठी निधीची तरतूद करून घेतली आहे.
- प्रजित नायर, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी